सोने-विदेशी चलन तस्करीप्रकरणी दोन प्रवाशांना अटक
१ कोटी ४८ लाखांच्या सोन्यासह विदेशी चलनाचा साठा जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सोने-विदेशी चलनाच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांत दोन प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने अटक केली. या कारवाईत या अधिकार्यांनी १ कोटी ४८ लाख ४४ हजार रुपयांच्या ११६५ ग्रॅम सोन्यासह ७७ हजार विदेशी चलनाचा साठा जप्त केला आहे. सोने-विदेशी चलनाच्या तसकरीप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी या दोन्ही प्रवाशांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांत विदेशातून सोने तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा सोने तस्करी करणार्या प्रवाशांविरुद्ध सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. शुक्रवारी रात्री उशिरा दुबईहून एक प्रवाशी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्या संशयास्पद हालचालीनंतर त्याला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या सामानाची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे काहीच सापडले नाही. मात्र त्याने त्यााच्या अंगावरुन सोने लपवून आणल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याच्याकडून या अधिकार्यांनी २४ कॅरेट क्रुड सोन्याच्या बांगड्या, पेंडंट असा ११६५ ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले. त्याची किंमत ८४ लाख ४६ हजार ५०६ इतकी आहे. जप्त केलेले सोने तो कोणाला देणार होता, त्यासाठी त्याला काही कमिशन मिळणार होते का याचा तपास सुरु आहे.
ही कारवाई ताजी असतानाच या अधिकार्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या अन्य प्रवाशाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हा प्रवाशी बँकॉंकला जाण्यासाठी तिथे आला होता. मात्र तिथे जाण्यापूर्वीच त्याला सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे या अधिकार्यांना ७७ हजार युएसडी करन्सी सापडले. त्याची किंमत ६३ लाख ९८ हजार रुपयांची इतकी आहे. ते विदेशी चलन त्याने त्याच्या ट्रॉली बॅगेच्या पोकळ टेलिस्कोपिक हॅण्डल बार आणि केबीन बारमध्ये लपविले होते. त्याच्याकडे विदेशी चलनाबाबत विचारणा केल्यानंतर त्याला उत्तर देता आले नाही. त्यानंतर त्याला विदेशी चलनाच्या तस्करीप्रकरणी या अधिकार्यांनी अटक केली. या दोन्ही प्रवाशांविरुद्ध सोने-विदेशी चलनाची तस्करीप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता.