पोलीस ठाण्यात तक्रार करण्यावरुन सुरक्षारक्षकावर हल्ला
चेंबूरची घटना; मित्राला अटक तर तिघांचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – पोलीस ठाण्यात तक्रार करण्यावरुन झालेल्या वादातून सलीम मोईनुद्दीन शेख या ३४ वर्षांच्या सुरक्षारक्षकावर चारजणांच्या एका टोळीने तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला. गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने सलीमवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी चारही आरोपीविरुद्ध आरसीएफ पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत मनोज ऊर्फ मन्या साबळे या आरोपी मित्राला पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत राहुल ऊर्फ सुदामासह इतर दोघेजण पळून गेले असून या तिघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.
ही घटना गुरुवारी ३ ऑक्टोंबरला रात्री दहा वाजता चेंबूर येथील वाशीनाका, आर. सी मार्ग, आशिष सिनेमागृहासमोर घडली. सलीम हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत असून सध्या वाशीनाका, सह्याद्रीनगर, शिवसेना मैदानाजवळील परिसरात राहतो. गुरुवारी तो त्याचा मित्र अशोक मुरलीधर खरात याच्यासोबत आशिष सिनेमागृहाजवळ गप्पा मारत होता. यावेळी सलीमचा मित्र मनोज तिथे आला आणि त्याने त्याच्याशी जुन्या वादातून भांडण सुरु केले होते. यावेळी त्याच्यासोबत इतर तीन तरुण होते. काही कळण्यापूर्वीच या सर्वांनी सलीमला पकडून बेदम मारहाहण केली. त्यानंतर त्यांच्याकडील चाकूने त्याच्या गळ्यावर वार केले होते. त्यात सलीम हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या सायन रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहे. ही माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सलीमच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मनोज, राहुल व इतर दोघांविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. प्राथमिक तपासात सलीम व चारही आरोपी एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. सलीम आणि मनोज खास मित्र होते, मात्र मनोजच्या मित्राने सलीमविरुद्ध आरसीएफ पोलिसात तक्रार केली होती. तेव्हापासून या दोघांमध्ये वाद सुरु होता. याच वादातून मनोजने सलीमवर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर चारही आरोपी तेथून पळून गेले होते. याच गुन्ह्यांत शुक्रवारी रात्री उशिरा मनोज साबळे याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सुदामसह इतर दोनजण पळून गेल्याने त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.