विदेशी नागरिकाची बॅग चोरी करणार्या आरोपीस अटक
छत्रपती संभाजीनगरातील राहत्या घरातून चोरीचा मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – नाशिक-दादर प्रवासादरम्यान एका विदेशी नागरिकाची बॅग चोरी करुन बॅगेतील पासपोर्ट आणि व्हिसा परत करुन इतर वस्तूचा अपहार करणार्या आरोपीस दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली. नवल प्रेमकुमार अग्रवाल असे या ४० वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा छत्रपती संभाजीनगरचा रहिवाशी आहे. त्याच्या राहत्या घरातून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले.
ट्रॅन मॅन्ह डक हे मूळचे व्हिएतनामच्या हनोई शहरातील रहिवाशी असून ऑनलाईन ट्रेनिंग म्हणून काम करतात. २७ सप्टेंबरला ते जनशताब्दी एक्सप्रेसमधून इगतपुरी-दादर असा प्रवास करत होते. ही ट्रेन सायंकाळी साडेपाच वाजता दादर रेल्वे स्थानकात आली होती. यावेळी ते कोचमध्ये त्यांची बॅग विसरले होते. काही वेळानंतर त्यांना बॅग ट्रेनमध्येच विसरल्याचे लक्षात आले होते, त्यामुळे त्यांनी दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांची भेट घेऊन त्यांना घडलेली माहिती सांगितली होती. याच दरम्यान त्यांना नवल अग्रवाल नाव सांगणार्या एका व्यक्तीचा फोन आला होता. त्याने त्यांचा पासपोर्ट आणि व्हिसा सापडल्याचे सांगून त्यांना पासपोर्ट आणि व्हिसा परत केला होता. मात्र बॅगेतील ६८ हजार रुपयांचा ऍपल कंपनीचा लॅपटॉप, चार्जर, अमेरिकन डॉलर, व्हिएतनाम आणि भारतीय चलन, विविध वापरासाठी असलेला ट्रॅव्हेलिंग चार्जर, आर्लम वॉच, टॉर्च, ट्रिमर, व्ही सर्व्हिस कंपनीच्य कारची चाची व इतर वस्तूविषयी त्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याची रेल्वे पोलिसांनीही चौकशी केली होती. मात्र त्याने उर्वरित मुद्देमाल आपल्याकडे नसल्याचे सांगितले. तो खोटी माहिती देत असल्याचे लक्षात येताच वरिष्ठांनी त्याची गंभीर दखल घेत दादर रेल्वे पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर शिरसाठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धर्मेंद्र आवारे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कांबळे, आकाश मोरे, पोलीस हवालदार पिसाळ, पाटील, पोलीस शिपाई गुरव, जगताप, तायडे, पाटील, शिंदे, पाटील यांनी तपास सुरु केला होता. या पथकाने सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन त्याला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर चोरीचा सर्व मुद्देमाल त्याच्या राहत्या घरी सापडला. चौकशीदरम्यान त्यानेच ही बॅग चोरी केल्याची कबुली देऊन पोलिसांची दिशाभूल केली होती. चोरीचा सर्व मुद्देमाल नंतर ट्रॅन डक यांच्या स्वाधीन करण्यात आला. जनशताब्दीमध्ये विसरलेली बॅग आणि आतील सर्व मुद्देमाल पुन्हा सापडल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम व त्यांच्या पथकाने विशेष आभार व्यक्त केले आहे.