अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरलची प्रेयसीला धमकी
ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सोशल मिडीयावर अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका २० वर्षांच्या तरुणीला तिच्याच प्रियकरानेच खंडणीसाठी धमकी देऊन तिच्याकडून खंडणीची रक्कम वसुल केल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तुषार परमार या प्रियकाविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी विनयभंगासह खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत लवकरच त्याची चौकशी करुन त्याच्यावर अटकेची कारवाई होईल असे पोलिसाकडून सांगण्यात आले.
२० वर्षांची तक्रारदार तरुणी ही घाटकोपर परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. एप्रिल महिन्यांत तिची तुषारसोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. एप्रिल ते ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत ते दोघेही एकमेकांच्या मोबाईलसह सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्कात होते. याच दरम्यान त्याने तिला तिचे काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठविण्यास प्रवृत्त केले होते. तिचे तुषारवर प्रेम होते, तसेच तो तिच्यावर लग्न करणार होता. त्यामुळे तिने त्याच्यावर विश्वास ठेवून तिचे काही अश्लील फोटोसह व्हिडीओ त्याला पाठविले होते. काही दिवसानंतर याच फोटोसह व्हिडीओचा आधार घेत त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. तिच्याकडे पैशांची मागणी करुन तिने पैसे दिले नाहीतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या धमकीने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता.
बदनामीच्या भीतीने तिने त्याला युपीआयद्वारे दहा हजार रुपये पाठविले होते. तरीही तो तिला सतत पैशांसाठी ब्लॅकमेल करुन तिची सोशल मिडीयावर बदनामीची धमकी देत होता. या धमकीनंतर तिने हा प्रकार तिच्या परिचित लोकांसह कुटुंबियांना सांगितली होती. त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने घाटकोपर पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगून तुषारविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध ३०८ (२), (३), ७८, ७९ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तुषारला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. तुषार हा घाटकोपर येथे राहत असून त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.