सिनेअभिनेत्रीच्या मोलकरणीच्या अल्पवयीन मुलीचा पर्दाफाश
उत्तरप्रदेशातून अल्पवयीन मुलीसह अपहरणकर्त्यांला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सिनेअभिनेत्री दिया मिर्झा हिच्याकडे कामाला असलेल्या मोलकरणीच्या सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा खार पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या पथकाने उत्तरप्रदेशातून बळीत अल्पवयीन मुलीची सुटका करुन तिचे अपहरण करणार्या आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची माहिती त्याच्या पालकांना देण्यात आली होती. या मुलीची सुखरुप सुटका करणार्या खार पोलिसांचे सिनेअभिनेत्री दिया मिर्झासह तक्रारदार महिलेने आभार व्यक्त केले आहेत.
३२ वर्षांची तक्रारदार महिला ही खार परिसरात राहत असून ती सध्या सिनेअभिनेत्री दिया मिर्झा हिच्याकडे कामाला आहे. तिला सोळा वर्षांची मुलगी असून ती सध्या शिक्षण घेते. शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये ती शिकते. गेल्या काही दिवसांपासून तिची मुलगी अभ्यासाकडे लक्ष देत नव्हती. सतत मोबाईलवर कोणाशी तरी संभाषण तसेच चॅटींग करत होती. त्यामुळे तिला समज देऊन अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगितले होते. याच दरम्यान तिला तिच्या मुलीचे दिल्लीतील एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले होते. ती त्याच्या संपर्कात होती. तिला त्याच्याशी लग्न करायचे होते. त्यामुळे तक्रारदार महिलेने तिला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच्याशी तिने लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. २८ सप्टेंबरला ही मुलगी कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघून गेली. मात्र ती घरी परत आली नाही. तिच्या आईने तिचा सर्वत्र शोध घेतला, तिच्या मित्रमैत्रिणीकडे तिची चौकशी केली. मात्र कोणालाही तिच्याविषयी काहीच माहिती नव्हती. त्यामुळे तिने खार पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगून मुलीची मिसिंग तक्रार केली होती. ही मुलगी अल्पवयीन असल्याने खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. याबाबत सिनेअभिनेत्री दिया मिर्झा हिने स्वत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांना कॉल करुन या मुलीचा शोध घेण्याची विनंती केली होती. या विनंतीनंतर पोलीस उपनिरीक्षक कुंभारे व अन्य पोलीस पथकाने या मुलीच्या मोबाईलची माहिती काढण्याचा प्रयत्न केला.
तांत्रिक माहितीवरुन ही मुलगी उत्तरप्रदेशातील गाजियाबाद येथे असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने गाजियाबाद येथून या मुलीची सुटका केली. चौकशीत तिचा प्रियकर हादेखील सोळा वर्षांचा असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्याला नोटीस देऊन मुंबईत चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले. या मुलीचा ताबा तिच्या पालकांकडे सोपविण्यात आला आहे. अपहरणाचा गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या पथकाने कुठलाही पुरावा नसताना या मुलीची गाजियाबाद येथून सुखरुप सुटका करुन तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. त्यामुळे दिया मिर्झा व तिच्याकडे काम करणार्या मोलकरणीने खार पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.