६० वर्षांच्या वयोवृद्धाच्या घरी २९ लाख रुपयांची घरफोडी
माझगावातील घटना; अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – आजारी सासूला पाहण्यासाठी कर्नाटकला गेलेल्या एका ६० वर्षांच्या वयोवृद्धाच्या बंद फ्लॅटमध्ये प्रवेश करुन अज्ञात व्यक्तीने सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याचा प्रकार माझगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या आरोपींचा सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरु केला आहे.
ही घटना ११ सप्टेंबर ते ६ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत माझगाव येथील म्हातारपाखडी, माझगाव मीना अपार्टमेंटमध्ये घडली. याच अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक ५११ मध्ये अशोक रामण्णा शेट्टी हे त्यांची पत्नी सुजाता आणि मुलगी अक्षिता यांच्यासोबत सतरा वर्षांपासून राहतात. जून २०२४ रोजी ते एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. शेट्टी कुटुंबिय मूळचे कर्नाटकचे रहिवाशी असून त्यांच्या गावी त्यांची सासूसह इतर नातेवाईक राहतात. सप्टेंबर महिन्यांत त्यांच्या सासूची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यामुळे ११ सप्टेंबर ते त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत त्यांच्या कर्नाटक येथील गावी सासूला पाहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. याच संधीचा फायदा घेऊन काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश केला होता. कपाटातील विविध सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची नाणी, चांदीच्या देवदेवतांची मूर्ती आणि एक लाख रुपयांचा कॅश असा २९ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.
६ ऑक्टोंबरला ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मुंबईत आले होते. घरी आल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करुन कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, कॅश आणि इतर मुद्देमाल असा सर्व मुद्देमाल चोरी केला होता. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी भायखळा पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.