लग्नास नकार देऊन मारहाण केली म्हणून तरुणीची आत्महत्या
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – चार वर्ष प्रेमसंबंध ठेवून प्रियकराकडून सुरु असलेल्या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून निकिता मनोहर लोंढे या २१ वर्षांच्या तरुणीने तिच्या राहत्या घरी विषारी किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना जोगेश्वरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी निकिताला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी हर्ष राऊत या आरोपीविरुद्ध मेघवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
सुमन मनोहर लोंढे ही महिला जोगेश्वरी परिसरात राहते. तिच्या पतीचे निधन झाले असून मुलगा नरेश हा एका खाजगी कंपनीत कामाला आहे तर तिची मोठी मुलगी निकिता ही जोगेश्वरीतील एका गार्मेंटमध्ये कामाला होती. तिचे हर्षसोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची माहिती तिने तिच्या आईसह भावाला सांगितली, यावेळी या दोघांनी त्याच्याशी संबंध ठेवू नकोस असे तिला सांगितले. तरीही त्यांचे प्रेमसंबंध सुरु होते. त्यामुळे त्यांनी तिचे हर्षसोबत लग्न करण्याचे ठरविले होते. याबाबत त्यांनी हर्षला त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यास सांगून त्याला दिवाळीपर्यंत मुदत दिली होती. ६ सप्टेंबरला हर्ष हा त्यांच्या घरी आला होता. यावेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. त्यानंतर निकिती ही हर्षसोबत घरातून निघून गेली. मात्र ती रात्री उशिरापर्यंत घरी आली नाही. त्यामुळे सुमनसह तिचा मुलगा नरेश यांनी तिला संपर्क साधण्यचा प्रयत्न केला, मात्र नंतर त्यांना निकिता तिचा मोबाईल घरी ठेवून गेल्याचे समजले. दुसर्या दिवशी सकाळी दहा वाजता निकिता ही घरी परत आली होती. तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने त्यांच्यात लग्नावरुन वाद झाल्याचे, त्यातून हर्षने तिला बेदम मारहाण केल्याचे सांगितले.
मात्र बदनामीच्या भीतीने त्यांनी हर्षविरुद्ध पोलिसात तक्रार केली नाही. त्या दिवशी निकिती ही घरात कोणीही बोलली नाही. तिने जेवण्यास नकार दिला होता. ती प्रचंड मानसिक तणावात दिसत होती. काही वेळानंतर ती अचानक उलट्या करु लागली. तिची प्रकृती बिघडल्याने त्यांनी तिला जोगेश्वरीतील ट्रामा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे उपचारादरम्यान त्यांना निकिताने उंदीर मारण्याचे किटकनाशक प्राशन केल्याचे समजले. तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारासाठी नंतर केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना ९ सप्टेंबरला निकिताचा मृत्यू झाला. चौकशीदरम्यान निकिती आणि हर्ष यांच्यात लग्नावरुन वाद झाला होता. हर्षने तिला प्रपोज करुन लग्नाचे आमिष दाखविले, मात्र ऐन वेळेस त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. त्यात त्याने तिला भरस्त्यात बेदम मारहाण केली होती. त्याचा तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यातून आलेल्या मानसिक नैराश्यातून तिने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केली होती.
या प्रकारानंतर सुमन लोंढे हिने मेघवाडी पोलीस ठाण्यात हर्ष राऊतविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध निकिताचा लग्नाचे आमिष दाखवून मानसिक व शारीरीक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून हर्षची लवकरच पोलिसाकडून चौकशी केली जाणार आहे.