शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुक
२६ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दोन भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एका बँक मॅनेजर तरुणीची सुमारे २६ लाखांची दोन भामट्यांनी फसवणुक केल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही भामट्याविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. इम्रान अहमद मुन्ने कुरेशी आणि आमीरअली दोस्तमोहम्मद मर्चंट अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी अशाच प्रकारचे इतर काही गुन्हे केले आहेत का याचाही पोलीस तपास करत आहेत.
पूनम अशोक गुप्ता ही तरुणी चेंबूर परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. ती सध्या घाटकोपरच्या एका खाजगी बँकेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कामाला आहे. त्यापूर्वी ती दुसर्या बँकेत रिलेशनशीप व्यवस्थापक म्हणून कामाला होती. २०१८ साली तिची बँकेचे खातेदार आमीरअलीशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने तिला तो शेअरमार्केटमध्ये कामाला असल्याचे सांगितले होते. काही दिवसांनी त्याने तिची ओळख इम्रानशी करुन दिली ोती. या दोघांनी तिला शेअरमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला देताना तिला शेअरमार्केटच्या विविध योजनेची माहिती दिली होती. त्यात तिला चांगला फायदा होईल असे सांगून त्यांनी तिचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे तिने त्यांच्यामार्फत शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी या दोघांनी तिला गुंतवणुक रक्कमेला तिला दरमाह दहा टक्के कमिशन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तिने त्यांच्यावर विश्वास ठेवून २८ ऑगस्ट २०२२ ते ५ मार्च २०२३ या कालावधीत सुमारे २६ लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुक रक्कमेवर तिला काही महिने कमिशनची रक्कम मिळत होती. मात्र नंतर त्यांनी कमिशनची रक्कम देणे बंद केले होते. याबाबत विचारणा केल्यानंतर ते दोघेही तिला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते.
याच दरम्यान तिला आमीर हा त्याच्या नवी मुंबईतील नेरळ येथील घरातून निघून गेल्याचे समजले. जवळपास एक वर्ष ती या दोघांच्या संपर्कात राहून तिच्या पैशांची मागणी करत होती. मात्र त्यांनी तिला पैसे दिले नाही. या दोघांनी नंतर त्यांचे मोबाईल बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने टिळकनगर पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर इम्रान कुरेशी आणि आमीरअली मर्चंट या दोघांविरुद्ध पोलिसांनी शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून पूनम गुप्ता हिची सुमारे २६ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.