बोगस लिंक पाठवून गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन फसवणुक
व्यावसायिकाला १.२२ कोटींचा गंडा घालणार्यांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बोगस लिंक पाठवून शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन कांदिवलीतील एका व्यावसायिकाची अज्ञात सायबर ठगांनी १ कोटी २२ लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या सायबर ठगांचा शोध सुरु केला आहे.
मेहुल अभिलाष झव्हेरी हे कांदिवलील महावीरनगर परिसरात रात असून त्यांची स्वतची इव्हेंट कंपनी आहे. जून महिन्यांत ते त्यांच्या घरी असताना त्यांना इंटाग्रामवर शेअरमार्केटमध्ये टिप्स आणि गाईडन्स करणारी एक जाहिरात दिसली होती. ही जाहिरात ओपन केल्यानंतर त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते. या गु्रपमध्ये रमन वर्मा हा ग्रुप ऍडमीनसह प्रमुख अधिकारी होता. त्याची कंपनी अधिकृत रजिस्ट्रर कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून अनेकांनी शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकींना त्यांना चांगला परतावा मिळत आहे असे भासविण्यात आले होते. त्यामुळे त्यांनीही त्यांच्या कंपनीमार्फत शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करावी, त्यात त्यांना चांगला फायदा होईल असे रमन वर्माने सांगितले होते. त्यासाठी त्यांना एक बोगस लिंक पाठविण्यात आली होती. ही लिंक ओपन करुन त्यांनी त्यांच्या नावाने रजिस्ट्रेशन करुन वैयक्तिक माहिती आणि कागदपत्रे अपलोड केले होते. त्यानंतर त्यांच्या मोबाईवर एक पासवर्ड पाठविण्यात आला होता. ग्रुप ऍडमीनसह इतरांच्या सांगण्यावरुन त्यांनी शेअरमार्केटमध्ये जून ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत १ कोटी २२ लाख ५ हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. त्यांनी एका आयपीओमध्ये ही गुंतवणुक केली होती. मात्र या आरोपींनी त्यांच्या मूळ रक्कमेसह नफ्याची रक्कम दुसर्या आयपीओमध्ये त्यांच्या संमतीविना ट्रान्स्फर केले होते. त्यांनी खरेदी केलेल्या शेअरची परस्पर विक्री केली होती.
हा प्रकार लक्षात त्यांनी मूळ रक्कमेसह नफ्याची सुमारे सव्वादोन कोटीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याची विनंती केली होती. ही रक्कम ट्रान्स्फर करण्यासाठी त्यांना आधी काही रक्कम जमा करण्यास सांगितले. मात्र त्यांनी ही रक्कम ट्रान्स्फर केली नाही. त्यानंतर त्यांनी त्यांना प्रतिसाद देणे बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी ६१ (२), ३४० (२), ३३८, ३३६ (३), (२), ३१९ (२), ३१८ (४) भारतीय न्याय सहिता सहकलम ६६ (डी), ६६ (सी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा सध्या सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे. ज्या बँक खात्यातून त्यांनी आर्थिक व्यवहार केला आहे, त्या बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.