रंगराज गरबा दांडियाच्या बोगस पासची विक्रीचा पर्दाफाश

बोगस पास बनवून विक्री करणार्‍या सहाजणांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बोरिवलीतील रंगराज गरबा दांडियाच्या बोगस पासची विक्री करणार्‍या एका टोळीचा बोरिवली पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी सहाजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून काही बोगस पास पोलिसांनी जप्त केले आहेत. मनोज वेरशी चावडा, अंश हितेश नागर, भव्य जितेंद्र मकवाना, राज शैलेश मकवाना, यश राजू मेहता आणि केयूर जगदीश नाई अशी या सहाजणांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी दांडियाचे काही बोगस पास जप्त केले असून उर्वरित पासेसची त्यांनी तीनशे, साडेचारशे आणि पाचशे रुपयांमध्ये विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

कुणाल भावेश तुर्किया हा बोरिवलीतील गोराई परिसरात राहतो. बोरिवलीतील बाळासाहेब ठाकरे मैदानात रायगड प्रतिष्ठानतर्फे रंगराज गरबा २०२४ या दांडिया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमांत कुणाल तुर्किया हा काम पाहत होता. दांडियासाठी येणार्‍या काही लोकांकडे बोगस पास असल्याचे आयोजकांच्या निदर्शनास आले होते. कमी किंमत बोगस विक्री होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी अंशचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला. त्याला पास हवे असल्याचे सांगून त्याला बोरिवली परिसरात बोलावून घेतले. तिथे आलेल्या अंशला ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याच्या इतर सहा मित्रांच्या मदतीने बोगस पास बनवून त्याची विक्री केल्याची कबुली दिली. त्यानंतर कुणाल तुर्किया याने बोरिवली पोलिसांत संबंधित आरोपीविरुद्ध ३१८ (४), ३३६ (२), (३), ३४० (२), ३३८ (५), भारतीय न्याय सहिता सहकलम ६६ (डी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अंशला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या इतर पाच सहकार्‍यांना पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली.

तपासात यशने बार कोड तयार करुन बोगस पास बनविले होते, मनोजने ते पास कांदिवलीतील श्रीजी दर्शन शॉपिंग सेंटरच्या चामुंडा स्टेशनरीमध्ये प्रिंट केली होती. त्यानंतर या बोगस पासची राज, भव्य, अंश आणि केयुर यांनी प्रत्येकी तीनशे, साडेचारशे आणि पाचशे रुपयांना विक्री केली होती. राज आणि मनोजने भव्यला ४०, अंशला ७४ तर केयुरला ३० बोगस पास दिले होते. या तिघांनी त्याच्या मित्रांनी काही पासचे विक्री केली होती. उर्वरित पास त्यांनी विक्रीसाठी ठेवले होते. मात्र त्यापूर्वीच बोगस पासचा पर्दाफाश झाला आणि पोलिसांनी सहाही आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काही आरोपींनी बोगस पास फेंकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page