गुंगीचे औषध देऊन १८ वर्षांच्या तरुणीवर लैगिंक अत्याचार

मुख्य आरोपीस अटक तर दुसर्‍या आरोपीचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – गुंगीचे औषध देऊन एका १८ वर्षांच्या तरुणीवर पडीक इमारतीमध्ये लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या फिरोज अब्दुल मोतीन खान या ३१ वर्षांच्या मुख्य आरोपीस निर्मलनगर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यांत आरोपीला मदत करणारा दुसरा सहकारी पळून गेला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून या दोन्ही आरोपींनी पिडीत तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. अटकेनंतर फिरोजला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

१८ वर्षांची ही मुलगी मूळची उत्तरप्रदेशच्या पिंधारा, फुलपूरची रहिवाशी आहे. तिचे नातेवाईक मिरारोड येथे राहत असून त्यांना भेटण्यासाठी ती उत्तरप्रदेशातून मुंबईत आली होती. शनिवारी तिला दोन तरुणांनी कारमधून लिफ्ट देऊन तिच्या नातेवाईकांच्या घरी सोडतो असे सांगितले. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून ती त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाली होती. काही वेळानंतर या दोघांनी तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिला एक पडिक इमारतीमध्ये आणले होते. तिथेच फिरोजने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार ५ ऑक्टोंबर ते ७ ऑक्टोंबर या कालावधीत घडला होता. लैगिंक अत्याचारानंतर या दोघांनी तिची काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतली होती. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर जिवे मारण्याची धमकी देऊन ते दोघेही तेथून पळून गेले होते. या घटनेनंतर तिने निर्मलनगर पोलीस ठाण्यात येऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध ७० (१), १२३, ३०८ (२), ३५१ (१), ११५ (२), ३ (५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश वाघ यांच्या पथकाने पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना काही तासांत पोलिसांनी फिरोज खान या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच पिडीत तरुणीवर लैगिंक अत्याचार केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याचा दुसरा सहकारी पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. पिडीत मुलीला भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिथेच तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिची मेडीकल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पिडीत तरुणीच्या नातेवाईकांचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page