आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाला लाच घेताना अटक
साक्षीदार म्हणून जबाब नोंदविण्यासाठी दहा टक्के कमिशनची मागणी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र वासुदेव सावर्डेकर यांना त्यांच्याच कार्यालयात दोन लाख रुपयांची लाचेची रक्कम घेताना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. फसणुकीच्या एका गुन्ह्यांत साक्षीदार म्हणून जबाब नोंदविणे आणि गुन्ह्यांचे कागदपत्रे सामिल करण्यासाठी फसवणुकीची दहा टक्के कमिशन म्हणून त्यांनी लाचेची मागणी केली होती. या लाचेच्या पहिला हप्ता घेताना ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी एनआयआर सागरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश संभाजी कदम यांना मुंबई युनिटच्या अधिकार्यांनी साडेतीन लाखांची लाच घेताना अटक केली होती. या कारवाईला काही तास उलटत नाही तोवर आता पोलीस निरीक्षक महेंद्र सावर्डेकर यांना दोन लाखांची लाच घेताना अटक झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
३३ वर्षांचे तक्रारदार मूळचे तामिळनाडूचे रहिवाशी आहेत. मुंबईत ब्लिस कन्स्टन्सी नावाची एक कंपनी असून या कंपनीने त्यांच्या गुंतवणुकदारासाठी विविध आकर्षक योजना सुरु केल्या होत्या. यातील एका योजनेत तक्रारदारांनी ४९ लाख ४४ हजार १७० रुपयांची गुंतवणुक केली होती. काही महिने कमिशन दिल्यानंतर कंपनीने गुंतवुकदारांना मूळ रक्कमेसह परवाता देणे बंद केले होते. काही दिवसांनी संचालकांनी कंपनीला टाळे लावून पलायन केले होते. हा प्रकार गुंतवणुकदारांच्या निदर्शनास येताच त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत कंपनीच्या संचालकासह इतर आरोपीविरुद्ध तक्रा केलीद होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर गेल्या वर्षी ब्लिस कन्स्टन्सी कंपनीसह संचालकाविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने ४०९, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक महेंद्र सावर्डेकर यांच्याकडे होता. या गुन्ह्यांत तक्रारदारांना साक्षीदार म्हणून जबाब नोंदविण्यासाठी आणि गुन्ह्यांतील कागदपत्रे सामिल करण्यासाठी महेंद्र सावर्डेकर यांनी त्यांच्याकडे फसवणुक झालेल्या रक्कमेपैकी दहा टक्के म्हणजे ४ लाख ९० हजार रुपयांच्या रक्कमेची लाचेची मागणी केली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने ८ ऑक्टोंबरला त्यांनी महेंद्र सावर्डेकर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीची संबंधित अधिकार्यांकडून शहानिशा करण्यात आली होती. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे लाचेचा दोन लाख रुपयांच्या पहिल्या हप्ता देण्याची मागणी केली होती. त्यानंतर या अधिकार्यांनी कर्नाक बंदर येथील पी. डिमेलो रोड, येलोगेट पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या आर्थिक शाखेजवळ साध्या वेशात सापळा लावला होता. बुधवारी तक्रारदार दोन लाख रुपये देण्यासाठी तिथे गेले होते. यावेळी त्यांच्याकडून दोन लाखांची लाच घेताना महेंद्र सावर्डेकर यांना या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईनंतर त्यांच्या कार्यालयासह घरावर पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईचा तपशील समजू शकला नाही. ही कारवाई अप्पर पोलीस उपायुक्त राजेंद्र सांगळे, अनिल घेरडीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने अटक केली.