वयोवृद्ध आई-वडिलांना दोन्ही मुलांनी घरातून बाहेर काढले
फ्लॅट नावावर करत नाही म्हणून सतत शिवीगाळ करुन मारहाण
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – फ्लॅट नावावर करत नाही म्हणून दोन मुलांनी स्वतच्या ७५ आणि ७८ वर्षांच्या वयोवृद्ध आई-वडिलांना घरातून बाहेर काढल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही मुलांकडून आई-वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण केली जात होती. याप्रकरणी ७५ वर्षांच्या महिलेच्या तक्रारीवरुन मालाड पोलिसांनी तिच्याच दोन्ही मुलांविरुद्ध भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रविण नाथालाल पारघी आणि अशोक नाथालाल पारघी अशी या दोघांची नावे असून या दोघांची लवकरच पोलिसाकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
७५ वर्षांची कांताबेन पारघी ही महिला तिचा नाथालाल (७८) आणि मुलगा अशोक याच्यासोबत गेल्या तेरा वर्षांपासून मालाड येथील सोमवारी बाजार, ओम दत्त मंदिर मार्गावरील सॉलिटेअर स्टार सोसायटीमध्ये राहते. कांताबेन या महानगरपालिकेतून निवृत्त झाल्या असून त्यांना पेंशन मिळते. त्यांचे राहते घर त्यांच्या पतीने २०११ साली विकत घेतले असून ते घर त्यांच्या संयुक्त नावावर आहे. त्यांना प्रविण आणि अशोक असे दोन मुले असून त्यापैकी प्रविण हा विवाहीत आहे. प्रविण हा तिचा मोठा मुलगा असून ती कामावर असताना तो तिला प्रचंड त्रास देत होता, त्यामुळे तिने तिच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तिच्या जागीच प्रविण कामाला लागला होता. तिचा लहान मुलगा अशोक हा अंध असून तो त्यांच्यासोबत राहतो. गेल्या नऊ वर्षांपासून त्यांचा फ्लॅट नावावर करण्यावरुन प्रविण हा त्यांचा मानसिक शोषण करत होता. मात्र कांताबेन आणि नाथालाल यांनी ते दोघेही हयात असेपर्यंत कोणाच्या नावावर फ्लॅट करणार नाही असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे प्रविण त्यांच्याशी सतत भांडण करुन त्यांना मारहाण करत होता. त्याला प्रविणची पत्नी सोनलची साथ होती. तीदेखील कांताबेन आणि नाथालाल यांना सतत शिवीगाळ करुन मारहाण करत होती. त्याच्या नावावर फ्लॅट केले नाही म्हणून तो त्याच्या पत्नीसोबत मालाडच्या मार्वे रोड परिसरात राहण्यासाठी गेला होता.
मात्र अधूनमधून तो त्यांना फ्लॅट नावावर करण्यासाठी सतत धमकी देत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा दुसरा मुलगा अशोक हादेखील फ्लॅट नावावर करण्यासाठी त्यांचा मानसिक शोषण करत होता. या दोघांकडून सतत होणार्या शिवीगाळ आणि मारहाणीला ते दोघेही पती-पत्नी कंटाळून गेले होते. मात्र कौटुंबिक वाद असल्याने त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. जून महिन्यांत याच कारणावरुन त्यांनी तिथे प्रचंड तमाशा केला होता. यावेळी तिच्या दोन्ही मुली अरुणा आणि लता यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रविण आणि अशोक यांच्यावर काहीच फरक पडला नव्हता. रागाच्या भरात त्यांनी कांतीबेन आणि नाथालाल यांना बेदम मारहाण करुन घरातून बाहेर काढले होते. तेव्हापासून ते दोघेही त्यांची मुलगी लता हिच्या घरी राहत आहेत. या दोघांनाही स्वतच्या घरात प्रवेश करण्यास ते दोघेही विरोध करत आहेत.
या दोघांची प्रकृती सध्या ठिक नसल्याने तसेच वयोवृद्ध असल्याने स्वतचे घर असूनही ते त्यांच्या मुलीच्या घरात नाईलाजास्तव राहत आहेत. त्यामुळे कांताबेन आणि नाथालाल यांनी मालाड पोलिसांत तक्रार करुन त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी तिथे उपस्थित पोलिसाकडे केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत दोन्ही मुले प्रविण आणि अशोक पारघी यांच्याविरुद्ध स्वतच्या वयोवृद्ध आई-वडिलांना शिवीगाळ करुन मानसिक शोषण करणे, त्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढून तिथे येण्यास मज्जाव करणे आदी ३५२ १२६ (२), ११५ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम २४ ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा मालाड पोलिसाकडून तपास सुरु आहे. दरम्यान या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत दोषी दोन्ही मुलांची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश मालाड पोलिसांना दिले आहे.