अपात्र करपरतावा मंजूर करुन १७६ कोटीचा जीएसटी घोटाळा
माझगावच्या विक्रीकर अधिकार्यासह सोळाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ मार्च २०२४
मुंबई, – बोगस दस्तावेजाच्या आधारे अपात्र कर परतावा मंजूर करुन राज्य शासनाची सुमारे १७६ कोटीचा आर्थिक फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विक्रीकर अधिकारी अमीत गिरीधर लाळगे यांच्यासह सोळा कंपनीच्या बोगस करदात्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच अमीत लाळगे यांच्यासह सोळा करदात्यांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
अमीत लाळगे हे विक्रीकर अघिकारी असून त्यांची माझगाव विभागात नेमणूक होती. ऑगस्ट २०१२ ते मार्च २०२२ या कालावधीत त्यांच्याकडे अतिरिक्त विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कालावधीत लिबर्टी ट्रेडर्स, एस. के फॅशन एक्सो, ट्रेडसेट एक्सपोर्ट ऍण्ड मार्केटिंग, टेक्नोटीप मार्क, आऊटसोर्स ओप्टीमायझेशन, लिंक पार्क इंफ्रा, बिल्डनेट एक्सपोर्ट ऍण्ड मार्केटिंग, फ्लोवेज मार्केटिंग, ईन स्न्वेअर सोलूशन, बालाजी ट्रेडर्स, व्हर्चुअल ओव्हरसिस मार्केटिंग, इरिक फॅशन्स, ग्लॅडस्टोन, ओनेक्स इंटरप्रायझेज, डेलमून इंटरप्रायझेज आणि ओनिक्स ट्रेड लिंक या सोळा करदत्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणाचे बोगस आणि खोटे भाडेकरारपत्र सादर केले होते. या कागदपत्रांच्या आधारे या कंपन्यांना जीएसटीएन क्रमांक मिळाले होते.
विशेष म्हणजे या कंपन्यांनी शासनाला कुठलाही कर भरला नसताना १७५ कोटी ९३ लाख १२ हजार ६२२ रुपयांचे कर परवात्यासाठी ३९ कर परताव्याचे अर्ज केले होते. या अर्जाची विक्रीकर विभागाकडून शहानिशा करण्याची गरज होती. मात्र तशी कुठलीही शहानिशा करण्यात आली नव्हती. संबंधित सर्व करदाते व त्यांचे अर्ज असल्याचे जीएसटी पोर्टलवरील बीओ सिस्टीममध्ये दिसत नव्हते. तरीही अमीत लाळगे यांनी ते अर्ज नामंजूर करण्याऐवजी त्यांच्या पदाचा गैरवापर करुन त्यांच्याशी संगनमत करुन स्वतसह सोळा करदात्यांच्या फायद्यासाठी अपात्र परतावा मंजूर केले आणि त्यांना सुमारे १७६ कोटीची रक्कम वितरीत केले होते. अशा प्रकारे त्याने व इतर सोळाजणांनी शासनाची फसवणुक आणि आर्थिक हानी केली होती.
अलीकडेच हा प्रकार निदर्शनास येताच माझगाव येथील जीएसटी भवनातील सहाय्यक विक्रीकर अधिकार्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अमीत लाळगे यांच्यासह इतर सोळाजणांविरुद्ध ७, १३ (१), (अ) सह १३ (२) भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ सहकलम १२० (ब), ४०३, ४०९, ४२०, ४६५ ४६७, ४६८, ४७१ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा अप्पर पोलीस आयुक्त विजय पाटील, अप्पर पोलीस उपआयुक्त राजेंद्र सांगळे, भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मानसिंग वचकल व त्याचे सहकारी तपास करत आहेत. लवकरच या सर्वांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांची जबानी नोंदवून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.