शहरात तीन अपघातात दोन अल्पवयीन मुलांसह तिघांचा मृत्यू
विक्रोळी-वांद्रे-गोवंडीतील घटना; दोन चालकांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – शहरात तीन अपघाताच्या घटनेत बारा व आठ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांसह एका रिक्षाचालक अशा तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शिवकुमार पाल या रिक्षाचालकासह हमीद मोहम्मद गुलफाम रेहमानी (८) आणि मोहम्मद अरबाज शकील अहमद शेख (१२) यांचा समावेश आहे. याप्रकरणी पार्कसाईट, शिवाजीनगर आणि निर्मलनगर पोलिसांनी तीन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन दोन आरोपी चालकांना अटक केली तर तिसरा कारचालक आरोपी पळून गेला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. विजय देवबा बागल आणि मातीउर रेहमान तबय हुसैन सावंत अशी या दोघांची नावे आहेत. अपघाताचा हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्यांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.
पहिला अपघात गोवंडीतील शिवाजीनगर, बैंगनवाडी, डंपिंग रोड, कमलारामन नगरात झाला. याच परिसरात गुलफाम मोहम्मद इलियास रेहमानी हा राहत असून मृत हमीद हा त्यांचा मुलगा आहे. मंगळवारी सायंकाळी चार वाजता तो कमलारामन नगर परिसरातून जात होता. यावेळी रस्ता क्रॉस करताना भरवेगात जाणार्या एका कचरा वाहून नेणार्या डंपरने त्याला जोरात धडक दिली. हा प्रकार तिथे उपस्थितांच्या लक्षात येताच त्यांनी चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला. जखमी झालेल्या हमीदला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी गुलफाम रेहमानी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डंपरचालक मातीउर रेहमान याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून एका आठ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
दुसरा अपघात मंगळवारी सकाळी दहा ते सव्वादहाच्या सुमारास वांद्रे येथील शासकीय वसाहत, इमारत क्रमांक पाचजवळील मैदानासमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शकील अहमद शेख हे वांद्रे येथील वाल्मिकीनगर, बीएमसी स्कूलजवळील परिसरात राहत असून ते टेलर म्हणून काम करतात. मोहम्मद अरबाज हा त्यांचा बारा वर्षांचा मुलगा असून तो वांद्रे येथील एका शाळेत शिकतो. मंगळवारी सकाळी तो त्याच्या मित्रांसोबत कार्डिनल स्कूलवरुन घरी जात होात. यावेळी इमारत क्रमांक पाचजवळील मैदानासमोर एका बेस्ट बसने त्याला धडक दिली. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दुपारी सव्वाबारा वाजता उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच खेरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी शकील शेख यांच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी बसचालक विजय बागल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला या गुन्ह्यांत अटक केली. अटकेनंतर या दोन्ही आरोपी चालकांची जामिनावर सुटका करण्यात आली.
तिसर्या घटनेत शिवकुमार पाल या रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. निकेश शिवकुमार पाल हा तरुण भांडुप येथे राहतो. मृत शिवकुमार हे त्याचे वडिल असून ते रिक्षाचालक म्हणून काम करतात. रविवारी सकाळी दहा वाजता ते नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन घरातून निघाले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नाही. त्यामुळे त्याने त्यांना कॉल केला होता. यावेळी त्याला त्याच्या वडिलांचा अपघात झाल्याचे समजले. त्यामुळे तो त्याच्या नातेवाईकांसोबत विक्रोळीतील गोदरेज हॉस्पिटलमध्ये गेला होता. यावेळी त्याला त्याच्या वडिलांचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजले. यावेळी तिथे असलेल्या रवि शेट्टीने सांगितले की, त्यांचे वडिल सायंकाळी सव्वासात वाजता विक्रोळीतील लालबहादूर शास्त्री मार्ग, महिंद्रा शोरुम, मेट्रो काम सुरु असलेल्या ठिकाणाहून जात होते. यावेळी एका कारचालकाने अचानक वळण घेतले, त्यामुळे त्यांनी कारला वाचविण्यासाठी रिक्षा वळवली होती. त्यात रिक्षाने एका पत्र्याला धडक दिली होती. त्यात रिक्षा पलटी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी निकेशच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर कारचालक पळून गेल्याने त्याचा सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस शोध घेत आहेत.