मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – चार कोटीच्या कर्जाचे गाजर दाखवून एका व्यावसायिकाला सुमारे साडेसतरा लाखांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार काळबादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अपहारासह फसवणुक केल्याप्रकरणी दोन ठगाविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. राममूर्ती शिवप्रसाद धतुराह आणि राहुल मांगीलाल जैन अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्यांनी अशाच प्रकारे इतर फसवणुकीचे काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.
अब्दुल हलीम अल्लारखॉं ान हे व्यावसायिक असून भेंडीबाजारच्या मांडवी परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे काळबादेवी येथील गोपाळवाडी, नारायण निवास इमारतीच्या तळमजल्यावर एक कारखाना आहे. त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी पैशांची गरज होती. बँकेसह आर्थिक पुरवठा कंपन्यांकडून कर्ज मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले होते. सप्टेंबर २०२२ रोजी त्यांची राममूर्ती धतुराह आणि राहुल जैन यांच्याशी ओळख झाली होती. या दोघांनी त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना त्यांच्या कारखान्यांच्या जागेवर चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनीही त्यांना कर्जासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. याच दरम्यान त्यांनी त्यांच्याकडून कर्जासाठी स्टॅम्प ड्युटी, प्रोसेसिंग फी आणि इतर कामासाठी २१ लाख ४९ हजार रुपये घेतले होते. मात्र एक ते दिड वर्ष उलटूनही त्यांनी त्यांना कर्ज मिळवून दिले होते. विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी कर्जासाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती.
यावेळी या दोघांनी त्यांना चार लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित साडेसतरा लाखांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. या दोघांकडून पैसे मिळण्याची शक्यता नसल्याने अखेर त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर राममूर्ती धतुराह आणि राहुल जैन यांच्याविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राममूर्ती हा मालाडच्या तपोवन, पठाणवाडी, चरण डेअरीजवळ तर राहुल जैन हा वसईतील सेक्टर आठ, ट्रिनिटी गार्डन अपार्टमेंटमध्ये राहतो. ते दोघेही पळून गेल्याने त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.