सरकारी नोकरी लावतो सांगून चौघांची तेरा लाखांची फसवणुक
कोल्हापूरच्या भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सरकारी नोकरी लावतो असे सांगून चौघांची सुमारे तेरा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी प्रसाद बापूसाहेब कांबळे या कोल्हापूरच्या भामट्याविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रसादने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जात असल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
यातील तक्रारदार दिपक जालिंदर कांबळे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत ताडदेव परिसरात राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांची प्रसाद कांबळे याच्याशी ओळख झाली होती. प्रसाद हा कोल्हापूरचा रहिवाशी असून त्याची मंत्रालयात चांगली ओळख आहे असे त्याने त्यांना सांगितला. शासकीय नोकरीसाठी कोणी इच्छुक असेल तर त्यांना नोकरी मिळवून देतो असे त्याने त्यांना सांगितले होते. त्यामुळे दिपक कांबळेसह त्यांच्या परिचित संदीप कर्नेकर, प्रकाश जुवेकर आणि विनायक पालेकर यांनी त्याच्याकडे शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. त्यासाठी त्यांची फोर्ट येथील मिंट रोड, आनंद भुवन हॉटेलमध्ये एक मिटींग झाली होती. या मिटींगमध्ये प्रसाद कांबळे यांनी चौघांनाही सरकारी नोकरी लावतो असे सांगितले. या नोकरीसाठी त्यांनी त्यांच्याकडून तेरा लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत कोणालाही शासकीय नोकरी मिळवून दिली नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे नोकरीसाठी दिलेल्या तेरा लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्यांना पैसेही परत केले नाही. अशा प्रकारे त्याने शासकीय नोकरीसाठी दिलेल्या पैशांचा अपहार करुन या चौघांची फसवणुक केली होती.
या प्रकारानंतर त्यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसात प्रसाद कांबळे याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. प्रसादने सरकारी नोकरी लावतो असे सांगून अनेकांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे फसवणुक झालेल्या लोकांनी रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस मार्ग पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसकडून करण्यात आले आहे.