कमी किंमतीत सोने देतो सांगून ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक
७६ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बाजार भावापेक्षा कमी किंमतीत शुद्ध सोने देतो असे सांगून अहमदनगरच्या एका ज्वेलर्स व्यापार्याची चारजणांच्या टोळीने सुमारे ७९ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमीत जैन, सुमेर सोनीसह इतर दोघांविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
तुषार चंद्रकांत कपाले हे अहमदनगरचे रहिवाशी असून त्यांचा सोने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या वडिलोपार्जित अहमदनगर येथे कपाले ज्वेलर्स नावाचे एक सोन्याचे दुकान आहे. अनेकदा ते दागिन्यासाठी मुंबईतून सोने खरेदी करतात. काही दिवसांपूर्वीच त्यांची त्यांच्या मित्रांनी अमीत जैनशी ओळख करुन दिली होती. अमीत हा ज्वेलर्स व्यापारी असून त्याच्या मालकीचे महिला ज्वेलर्स नावाचे एक दुकान असल्याचे सांगितले होते. त्याचा सोन्याचा खरेदी-विक्रीचा मोठा व्यवसाय असून तो त्यांना सोने लिलावाद्वारे त्यांना बाजार भावापेक्षा कमी दरात सोने देईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन कण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी अमीतसोबत व्यवहार करण्याचा निर्णय घेतला होता. २५ सप्टेंबरला त्याने त्यांना झव्हेरी बाजार येथील चौक्शी विमलकुमार ऍण्ड कंपनी या दुकानात बोलावून घेतले होते. त्यामुळे ते तिथे गेले होते. यावेळी त्याने त्यांची ओळख सुमेर जैनशी ओळख करुन तो त्याचा भाऊ असल्याचे सांगितले. तिथे त्यांनी त्यांच्याकडून ३७ लाख ७६ हजार २५० रुपयांचे पेमेंट करुन अर्धा किलो शुद्ध सोने खरेदी केले होते.
या व्यवहारानंतर त्यांना त्यांच्यावर विश्वास बसला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे आणखीन शुद्ध सोन्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी सध्या त्यांच्याकडे शुद्ध सोने नसून दुसर्या व्यापार्याकडून सोने देण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी त्यांनी त्यांच्या आगाऊ पैशांची मागणी केली होती. त्यामुळे तुषार कपाले यांनी त्यांना एक किलो शुद्ध सोन्यासाठी २५ सप्टेबर आणि २६ सप्टेंबरला कॅश स्वरुपात ७९ लाख ६८ हजार रुपये दिले होते. त्यानंतर या दोघांसह इतर दोघांनी सोने आणून देतो असे सांगून त्यांना हॉटेलमध्ये थांबण्यास सांगितले. बराच वेळ होऊन ते तिथे आले नाही. त्यामुळे त्यांनी अमीत आणि सुमेरला कॉल केला, मात्र या दोघांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. नंतर या दोघांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते. त्यामुळे ते पुन्हा चौक्शी विमलकुमार ऍण्ड कंपनीत गेले. तिथे त्यांना अमीत हा त्यांचा परिचित व्यापारी असून त्याच्याकडून पेमेंट घेऊन आम्ही त्याला सोने देतो असे सांगितले. व्यवहारावगळता त्याचा त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले.
कमी किंमतीत एक किलो शुद्ध सोने देतो असे सांगून अमीत, सुमेरसह इतर दोघांनी त्यांच्याकडून ७९ लाख ६८ हजार रुपये घेऊन सोने न देता त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घडलेला प्रकार एल. टी मार्ग पोलिसांना सांगून त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अमीत जैन, सुमेर सोनीसह इतर दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.