बोगस गिफ्ट व्हाऊचरद्वारे फसवणुक करणार्‍या त्रिकुटास अटक

वॉटर किंगडमची सुमारे ७२ लाखांची फसवणुक केल्याचा आरोप

0

अरुण सावरटकर
११ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बोरिवलीतील गोराई परिसरात असलेल्या वॉटर किंगडमचे बोगस गिफ्ट व्हाऊचरची छपाई करुन त्याची विक्री करुन व्योमन इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीची सुमारे ७२ लाखांची फसवणुक करणार्‍या एका टोळीचा गोराई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत एका मुख्या आरोपीसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ओमप्रकाश पाल, रोहित कौशल तिवारी आणि दिपाकरकुमार मौर्या अशी या तिघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

विश्‍वास वासुदेव भुजबळ हे त्यांच्या कुटुंबियांसोबत मिरारोड येथे राहतात. गेल्या ३२ वर्षांपासून ते लोअर परेल येथील व्योमन इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या कंपनीचे वॉटर किंगडम, एस्सेलवर्ड आणि बर्डपार्क या करमणुकीच्या आस्थापना आहेत. १९९४ सालापासून ते बोरीवलीतील गोराई परिसरात असलेल्या वॉटर किंगडम येथे अकाऊंट विभागात मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या वॉटर किंगडम या वॉटरपार्कचे एक दिवसांचे तिकिट १४५० रुपये आहे. या वॉटर पार्कला जास्तीत लोकांचा प्रतिसाद मिळावा, त्यातून कंपनीचा फायदा व्हावा यासाठी कंपनीने विविध आकर्षक योजना सुरु केल्या होत्या. त्यात गिफ्ट व्हाऊचर, पासपोर्ट, मेट्रो कार्ड आदी योजनांचा समावेश होता.

ही योजना एक वर्षांसाठी असते. दोन वर्षांपूर्वी कंपनीने अशाच विविध योजनेची सुरुवात केली होती. त्यासाठी कंपनीने मोठ्या प्रमाणात गिफ्ट व्हाऊचर बनविले होते. ते व्हाऊचर त्यांच्या अधिकृत एजंटला ९०० रुपयांना तर एजंटकडून अतिरिक्त शंभर आणि दोनशे रुपये आकारुन ते ग्राहकांना विकले जात होते. त्यामुळे कंपनीसह एजंटचा फायदा तसेच ग्राहकांना कमी दरात तिकिट मिळत असल्याने त्यांचाही फायदा होत होता. त्यासाठी कंपनीने कुर्ला येथील एक्सपर्ट इंटरप्रायझेज कंपनीकडून काही गिफ्ट व्हाऊचरची ऑर्डर देऊन छापून घेतली होती. त्यापैकी काही गिफ्ट व्हाऊचर त्यांच्या अधिकृत एजंटला देण्यात आले तर उर्वरित त्यांच्या मुख्य कार्यालयात पाठविण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांत कंपनीने १ लाख पाच हजार गिफ्ट व्हाऊचरची ऑर्डर देऊन ७७ हजार ५०० गिफ्ट व्हाऊचरचे वाटप केले होते. ऑगस्ट महिन्यांत त्यांच्या मोठ्या प्रमाणात कंपनीचे गिफ्ट व्हाऊचर प्राप्त झाले होते त्याचे सिरीयल क्रमांक नऊ आणि सात असे होते.

या सर्व व्हाऊचरची तपासणी केल्यानंतर कोणीतरी कंपनीच्या बोगस गिफ्ट व्हाऊचर मार्केटमध्ये विक्री केल्याचे उघडकीस आले होते. गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारे ८७ हजार गिफ्ट व्हाऊरची विक्री करुन कंपनीची ७२ लाखांची फसवणुक करण्यात आली होती. हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने गोराई पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध ३१८, ३३५, ३३६ (१), (२), (३), ३३८, ३४० (२), ३ (५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हा तपास सुरु असताना पळून गेलेल्या ओमप्रकाश, रोहित आणि दिपाकरकमार या तिघांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page