अफु तस्करीच्या गुन्ह्यांतील आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
शेतकर्यासह चौघांना ९६९० ग्रॅम वजनाच्या अफुसह अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – अफु तस्करीच्या गुन्ह्यांतील एका आंतरराज्य टोळीचा मुंबई युनिटच्या डीआरआयच्या अधिकार्यांनी अटक केली. यावेळी रतलामहून आणलेल्या ९६९० ग्रॅम वजनाच्या अफुसह चारजणांच्या टोळीला या अधिकार्यांनी अटक केली असून त्यात मध्यप्रदेशातील एका शेतकर्याचा समावेश आहे. या चौघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्यांना लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
इतर राज्यातून अफु आणून त्याची शहरात विक्री करणारी एक आंतरराज्य टोळी आहे. या टोळीकडून लवकरच मुंबई शहरात अफुचा मोठा साठा पाठविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई युनिटच्या डीआरआयच्या अधिकार्यांना मिळाली होती. त्यामुळे या अधिकार्यांनी या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेताना दोन विशेष पथकाची नियुक्ती केलीद होती. हा तपास सुरु असताना रतलात येथून अफुचा साठा ट्रकच्या माध्यमातून मुंबईत येणार असल्याचे या पथकाला समजले होते. त्यामुळे या पथकाने दोन्ही टोलनाक्यावर साध्या वेशात पाळत ठेवली होती. शुक्रवारी पहाटे एका टोलनाक्यावर आलेला ट्रक या अधिकार्यांनी थांबवून आतील सामानाची झडती घेतली होती. त्यात या अधिकार्यांना ९६९० ग्रॅम वजनाचा अफु सापडला. हा साठा ताब्यात घेतल्यानंतर या अधिकार्यांनी मुंबईसह रतलाम येथून तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीतून मध्यप्रदेशातील एका शेतकर्याचे नाव समोर आले होते. त्यानंतर या पथकाने मध्यप्रदेशातून या शेतकर्यालाही ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत चारही आरोपींचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या चौघांनाही एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या अधिकार्यांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत अफुची तस्करी करणारी ही एक आंतरराज्य टोळी असल्याचे उघडकीस आले आहे. या आरोपींनी यापूर्वीही अफुची तस्करी केली होती का याचा पोलीस तपास करत आहेत.