माजी आमदार बाबा सिद्धीकी यांची गोळी झाडून हत्या
पूर्वनियोजित कट; दोन संशयितांना अटक तर तिसर्याचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – कॉंगेस पक्षातून अजीत पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश केलेले माजी आमदार, राज्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते बाबा सिद्धीकी यांची वांद्रे येथील कार्यालयाबाहेर बाईकवरुन आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. बाबा सिद्धीकी यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या पूर्वनियोजित असल्याचे बोलले जाते. गोळीबारानंतर पळून गेलेल्या दोन संशशितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एकजण उत्तरप्रदेश तर दुसरा हरियाणाचा रहिवाशी आहे. तिसरा आरोपी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही हत्या एसआरएच्या वादातून सुपारी देऊन झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बाबा सिद्धीकी हे वांद्रे परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून ते कॉंग्रेस पार्टीकडून १९९०, २००४, २००९ साली सलग तीन वेळा वांद्रे विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. २००४ साली त्यांना राज्यमंत्री देण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते कॉंग्रेस पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांशी नाराज होते. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेस पार्टीतून अजीत पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत जाण्याचा निर्णय घेतला होता. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत अधिकृत प्रवेश केला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादी पार्टीसाठी सक्रिय काम करत होते. त्यांचा मुलगा झिशान सिद्धीकी हा विद्यमान आमदार असून त्याचे वांद्रे येथील निर्मलनरगर, खेरवाडी जंक्शन परिसरात एक कार्यालय आहे. तिथे बाबा सिद्धीकी हे नियमित जात होते. शनिवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे तिथे गेले होते. रात्री सव्वानऊ वाजता ते झिशान सिद्धीकी यांच्या कार्यालयात फटाके फोडत होते. याच दरम्यान तिथे आलेल्या दोन ते तीन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दिशेने गोळीबार केला होता. त्यातील एक गोळी त्यांच्या छातीत लागल्याने ते जागीच कोसळले होते. गोळीबारानंतर तिन्ही मारेकरी तेथून पळून गेले होते.
रक्तबंबाळ झालेल्या बाबा सिद्धीकी यांना त्यांच्या मुलासह इतर कार्यकर्त्यांनी तातडीने जवळच्या लिलावती रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोळीबाराची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह निर्मलनगर आणि गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याच गुन्ह्यांत दोन संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या दोघांची चौकशी सुरु आहे. यातील एक आरोपी उत्तरप्रदेश, दुसरा हरियाणाचा रहिवाशी आहे. तिसरा आरोपी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मारेकर्यांना सुपारी देऊन ही हत्या करण्याचे आदेश दिले होते. ही हत्या पूर्वनियोजित असल्याचे उघडकीस आले आहे. या गोळीबारामागील कारण आणि कोणाच्या सांगण्यावरुन हा गोळीबार करण्यात आला याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
बाबा सिद्धीकी यांचे अनेक पक्षाच्या राजकीय नेत्यासह बॉलीवूड कलाकारांसोबत चांगले संबंध होते. त्यात सलमान खान आणि संजय दत्त यांचा समावेश होता. ते दोघेही बाबा सिद्धीकी यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून परिचित होते. त्यामुळे बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त समजताच अनेक राजकीय नेत्यासह बॉलीवूड कलाकारांनी लिलावती रुग्णालयात धाव घेतली होती. रात्री उशिरापर्यंत त्यांचे समर्थक विशेषता महिला वर्ग लिलावती रुग्णालयात जमा झाले होते. बाबा सिद्धीकी हे रियल इस्टेट व्यवसायाशी संबंधित होते. त्यांनी अनेक एसआरएसह इमारतीचे प्रोजेक्ट हाती घेतले होते. याच व्यवसायासह एसआरए प्रोजेक्टच्या वादातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र याबाबत मुंबई पोलिसाकडून रात्री उशिरापर्यंत काहीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने बोलताना सांगितले.
हत्येमागे वांद्रे येथील एसआरएचा वाद कारणीभूत?
वांद्रे येथील बीकेसी मैट्रो स्टेशनजवळल संत ज्ञानेश्वर नगर परिसरात एसआरएचा एक मोठा प्रोजेक्ट सुरु होता. हा प्रोजेक्ट आपल्या कंपनीला मिळावायासाठी यासाठी बाबा सिद्धीकी यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र या प्रोजेक्टवरुन त्यांचा विरोधकासह स्थानिक रहिवाशांमध्ये वाद झाला होता. काही महिन्यानंतर ते प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयात बाबा सिद्धीकी यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडून हा प्रोजेक्ट त्यांनाच मिळावा यासाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र या खटल्यात त्यांच्या विरोधात निकाल लागला होता. त्यानंतर त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. बाबा सिद्धीकी हे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्यामुळे हा प्रोजेक्ट रखडला जाण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांचा काटा काढण्यासाठी सुपारी देऊन ही हत्या करण्यात आली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या सर्व शक्यता पोलिसांकडून पडताळून पाहिली जात आहे. एसआरए वाद वगळता दुसर्या कुठल्या कारणावरुन ही हत्या झाली का याचाही पोलीस तपास करत आहेत.
पंधरा दिवसांपूर्वीच जिवे मारण्याची धमकी?
बाबा सिद्धीकी यांना पंधरा दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. तुझा गेम करु अशी धमकीच अज्ञात व्यक्तीने दिल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धमकीची तक्रार केली होती. या धमकीनंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. ही सुरक्षा असताना बाबा सिद्धीकी यांची बाईकवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली याबाबत आता आश्चर्य व्यक्त होत आहे.