मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – ड्रग्ज तस्करीप्रकरणी एका विदेशी नागरिकासह तिघांना ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या कांदिवली, आझाद मैदान आणि घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांनी अटक केली. रिचर्ट कोम्मे, अरबाज ऊर्फ जब्बार आणि इम्रान अशी या तिघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे ४७ लाख रुपयांचे कोकेनसह कोडेनमिश्रीत सिरपचा साठा जप्त केला आहे. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तिघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
जोगेश्वरी परिसरात काही विदेशी नागरिक कोकेनची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती आझाद मैदान युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात गस्त सुरु केली होती. ही गस्त सुरु असताना पोलिसांनी रिचर्ट कोम्मे या केनियन नागरिकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी ११० ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ४४ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. अन्य दोन कारवाईत कांदिवली आणि घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांनी गोवंडीतील शिवाजीनगर आणि वांद्रे येथील खैरवाडी परिसरातून अरबाज ऊर्फ जब्बार आणि इम्रान या दोघांना अटक केली होती. अरबाजकडून ४४७ तर इम्रानकडून ८८ कोडेनमिश्रीत सिरपरचा साठा जप्त केला आहे. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी ५६५ कोडीनमिश्रीत सिरपचा साठा जप्त केला असून त्याची २ लाख ८७ हजार रुपये आहे.
जानेवारी ते ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत मुंबई पोलिसांच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलने एनडीपीएस कलमार्ंतत आतापर्यंत ६३ गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांत १३५ आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून ४५ कोटी ११ लाख रुपयांचा विविध ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.