मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – खाऊच्या पॅकेटमधून लपवून आणलेला सुमारे ५९ लाखांचा विदेशी गांजाचा साठा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत एका प्रवाशाला या अधिकार्यांनी अटक केली असून त्याच्याकडे ५९६ ग्रॅम वजनाचा गांजा सापडल्याचे सांगण्यात आले. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमार्ंगत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याची जामिनावर सुटका केली.
गेल्या काही महिन्यांत विदेशातून ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा प्रवाशांविरुद्ध या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना शनिवारी बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाला विमानतळाबाहेर जाण्यापूर्वीच या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडील सामानासह खाद्यपदार्थाची तपासणी केली असता त्यात या अधिकार्यांना ५९६ ग्रॅम वजनाचे विदेशी गांजाचा साठा सापडला. त्याची किंमत ५९ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. हा गांजा त्याला बँकॉक एका व्यक्तीने दिला होता. याकामी त्याला काही ठराविक रक्कमेचे कमिशन देण्यात आले होते. हा गांजा जप्त करुन आरोपी प्रवाशाविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला रविवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन त्याला कोर्टाने जामिन मंजुर केला.