राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाच्या हत्येचा तपास गुन्हे शाखेकडे
तिन्ही आरोपीसह गुन्ह्यांचे कागदपत्रे गुन्हे शाखेच्या स्वाधीन
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अजीत पवार गटाचे भायखळा तालुका अध्यक्ष सचिन राममुरत कुर्मी (४६) यांच्या हत्येचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडे सोपविण्यात आला आहे. तिन्ही आरोपीसह गुन्ह्यांतील सर्व कागदपत्रै गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या आरोपींमध्ये आनंदा अशोक काळे ऊर्फ अन्या, विजय ज्ञानेश्वर काकडे ऊर्फ पप्या आणि प्रफुल्ल प्रविण पाटकर यांचा समावेश असून ते तिघेही सध्या मंगळवार १५ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांनी सांगितले.
सचिन कुर्मी हे भायखळा परिसरात राहत होते. ४ ऑक्टोंबरला रात्री उशिरा त्यांची घोडपदेव येथील फिरोज ऍण्ड फ्लॉवर्सजवळ काही अज्ञात व्यक्तींनी तिक्ष्ण हत्माराने वार करुन हत्या केली होती. या हत्येनंतर मारेकरी तेथून पळून गेले होते. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पळून गेलेल्या मारेकर्यांचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना काही तासांत पोलिसांनी आनंदा काळे, विजय काकडे आणि प्रफुल्ल पाटकर या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच सचिन कुर्मी यांची हत्या केल्याची कबुली दिली. पूर्ववैमस्नातून ही हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले होते. अटकेनंतर या तिघांनाही रविवारी ६ ऑक्टोंबरला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिघांनाही मंगळवार १५ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या गुन्ह्यांचा तपास पोलीस आयुक्तांच्या आदेशावरुन भायखळा पोलिसाकडून गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे गुन्ह्यांतील कागदपत्रांसह तिन्ही आरोपींचा ताबाा गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या गुन्ह्यांत आता गुन्हे शाखेकडून नव्याने तपास सुरु करण्यात आला आहे.