मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – माजी आमदारसह राज्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या बाबा सिद्धीकी यांच्या हत्येसाठी पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हत्येपूर्वी मारेकर्यांना तीन लाख रुपये देण्यात आले तर हत्येनंतर उर्वरित दोन लाख रुपये देण्याचे ठरले होते. या गुन्ह्यांचा वॉण्टेड आरोपी शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा हाच मुख्य आरोपी असून त्याला ही सुपारी देण्यात आल्याचे बोलले जाते. टार्गेट बाबा सिद्धीकी असे मिशनचे नाव ठेवण्यात आले होते.
शिवकुमार हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून तो सध्या बिष्णोई टोळीसाठी काम करतो. त्याच्यावरच बिष्णोई टोळीने बाबा सिद्धीकी यांच्या हत्येची जबाबदारी सोपवलिी होती. त्यासाठी त्याला तीन लाख रुपये आगाऊ देण्यात आले होते. हत्येनंतर त्याला आणखीन दोन लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले होते. कोणालाही संशय येऊ नये म्हणून शिवकुमार हा काही दिवसांपासून पुण्यात वास्तव्यास होता. त्यानंतर त्याच्यासोबत गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप हे सामिल झाले होते. या दोघांना कटाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर ते तिघेही मुंबईत आले होते. कुर्ला येथे ते तिघेही भाड्याच्या रुममध्ये राहत होते. कुर्ला येथे वास्तव्यास असताना त्यांनी या संपूर्ण कटाची आखणीसह रेकी केली होती. बाबा सिद्धीकी, त्यांचा आमदार मुलगा झिशान सिद्धीकी हे घरातून कधी बाहेर पडतात, ते त्यांच्या कार्यालयात कधी येतात, कार्यालयातून घरी कधी जातात याची संपूर्ण माहिती काढली होती. या माहितीसह हत्येसाठी गुरमेल आणि धर्मराजला प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यात आले होते. हत्येनंतर दोघांनाही आणखीन पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र गोळीबारानंतर ते दोघेही पकडले गेले. शिवकुमार हा वांद्रे येथून कुर्ला आणि नंतर पनवेलला गेला. त्याच्या मोबाईलचा लास्ट लोकेशन पनवेल होते. तेथून तो पुण्याला नंतर महाराष्ट्राबाहेर पळून गेल्याचे बोलले जाते. त्यामुळे शिवकुमारच्या अटकेसाठी गुन्हे शाखेची दोन ते तीन टिम पुण्यासह इतर ठिकाणी रवाना झाले आहेत. शिवकुमारसह मोहम्मद जिशान अख्तर, शुभम लोणकर या तिघांना या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले. या तिघांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
शूटरला फायरिंगचे प्रशिक्षण मिळाल्याचा दावा
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या मारेकर्यांना फायरिंगचे विशेष प्रशिक्षण मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. या आरोपींचा नेम अचूक होता. त्यासाठी त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले होते, ते प्रशिक्षण कुठे आणि केव्हा घेतले. त्यांना फायरिंगचे प्रशिक्षण कोणी दिले याचा पोलिसाकडून तपास सुरु आहे. बाबा सिद्धीकी यांची हत्या करण्यापूर्वी तिन्ही मारेकर्यांनी त्यांच्या दैनदिन कामाची रेकी होती. ही रेकी केल्यानंतरच त्यांनी दसर्याला झिशान सिद्धीकी यांच्या कार्यालयातून घरी जाताना बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळी करण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे ते तिथे आधीपासून फिल्डींग लावून बसले होते. रात्री बाबा सिद्धीकी हे घरी जाण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांनी त्यांच्या दिशेने सहा गोळ्या फायर केल्या. त्यापैकी बाबा सिद्धीकी यांच्या छातीत तीन गोळ्या लागल्या आणि ते जागीच कोसळले. घटनास्थळी पोलिसांना सहा रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. मारेकर्यांनी ९.९ एमएम पिस्तूलचा वापर केला होता.
समुद्रकिनार्यांनी तिघांनी काढले एकत्र फोटो
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर तिन्ही मारेकर्यांचे एक फोटो व्हायरल झाले होते. ते फोटो त्यांनी समुद्रकिनार्यांवर काढले होते. या तिघांनी एकत्र फोटो का काढला, तो फोटो त्यांनी कधी आणि कुठे काढला होता, एकत्र फोटो काढण्यामागे त्यांचा काय उद्देश होता याचाही पोलीस तपास करत आहेत.