प्रविणने आर्थिक मदत तर शुभमने शस्त्रे पुरविल्याचे उघड
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर लोणकर बंधूंचा पर्दाफाश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादीचे नेते झियाउद्दीन अब्दुल रहिम सिद्धीकी ऊर्फ बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून अटक करण्यात आलेल्या प्रविण लोणकर याचा या हत्येत काहीही संबंध नसून या गुन्ह्यांत त्याला बळीचा बकरा बनविण्यात आल्याचा आरोपीच्या वकिलांनी आरोप खोटा असल्याचा दावाच मुंबई पोलिसांनी केला आहे. या संपूर्ण हत्येत प्रविणने मारेकर्यांना आर्थिक मदतीसह लॉजिस्टिक मदत तर त्याचा भाऊ शुभम लोणकर याने शस्त्रे पुरविल्याचे आतापर्यंतच्या चौकशीतून उघडकीस आले आहे. या दोघांचेही बिष्णोई टोळीशी थेट संबंध असल्याचा पोलिसांनी सांगितले. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर लोणकर बंधूंच्या कारवायांचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.
लोणकर बंधू हे पुण्यातील रहिवाशी असून यातील शुभम याला जानेवारी महिन्यांत घातक शस्त्रांच्या तस्करीप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो काही महिने जेलची हवा खाऊन आली होती. मात्र जामिन मिळताच तो पळून गेला होता. जून महिन्यांपासून शुभम हा फरार असून त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत. प्रविण हा शुभमचा भाऊ असून त्याने या हत्येच्या कटात महत्त्वाची भूमिका पार पडल्याचे आतापर्यंत चौकशीतून उघडकीस आले आहे. बाबा सिद्धीकी यांच्या तिन्ही मारेकर्यांना प्रविण लोणकर यानेच आर्थिक मदत केली होती. इतकेच नव्हे तर या मारेकर्यांना बाबा सिद्धीकी हेच टार्गेट असल्याचे प्रविणकडून सांगण्यात आले आहे. त्यासाठी त्याने त्यांना बाबा सिद्धीकी यांचा फोटोसह वांद्रे परिसरात त्यांच्या बॅनरचे फोटो दिले होते. शुभमच्या सांगण्यावरुन प्रविणने तिन्ही मारेकर्यांच्या राहण्याची-खाण्याची व्यवस्था केली होती. या मारेकर्यांना आर्थिक मदत त्यानेच केली होती. काही दिवसांपूर्वी त्याने बाबा सिद्धीकी यांचा फोटो देताना त्यांचा तेच टार्गेट असल्याचे सांगितले होते. प्रविणने एक डेअरी शॉप असून त्याच्याच बाजूला एक भंगारवाल्याचे दुकान आहे. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांना तिथे कामावर ठेवले होते. त्यांना विश्वासात घेतल्याने त्याने बाबा सिद्धीकी यांचा फोटो देऊन त्यांना मुंबईत त्यांची हत्या करायची आहे अशी माहिती दिली होती. गुरमेल सिंग याला या कटात सामिल करुन घेतल्यानंतर त्याला थेट मुंबईत येण्यास सांगण्यात आले होते. मुंबईतील कुर्ला येथे राहण्याची व्यवस्थाही प्रविणने केली होती. या संपूर्ण कटात त्याने त्यांना आर्थिक मदत केली होतीतर शुभमने मारेकर्यांना शस्त्रे पुरविली होती, मात्र प्रविणने कोणाच्या सांगण्यावरुन त्यांना पैसे दिले होते याबाबात त्याची सध्या चौकशी सुरु आहे. सर्व आर्थिक व्यवहार कॅशने झाला होता असेही एका अधिकार्याने बोलताना सांगितले.