दहा वर्षांच्या मुलीवर पित्याकडून विनयभंगासह लैगिंक अत्याचार
स्टीलच्या गरम ग्लासने चटके दिले; आरोपी पित्याला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ मार्च २०२४
मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) – घरात झोपलेल्या दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच पित्याने विनयभंगासह लैगिंक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन कुरार पोलिसांनी विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या गुन्हा नोंदवून आरोपी पित्याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मालाड परिसरात उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
२५ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या पती आणि दहा वर्षांच्या मुलीसोबत मालाड परिसरात राहते. ही मुलगी घरात झोपली असताना तिचेच वडिल तिच्या छातीसह इतर ठिकाणी हात फिरवून तिचा विनयभंग करत होते. तिच्याशी अश्लील चाळे करुन तिच्यावर त्याने अनेकदा लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणेन तो तिला धमकी येत होता. काही दिवसांपूर्वीच त्याने स्टिलच्या गरम क्लासने तिच्या मांडीला चटके दिले होते. त्यात तिला गंभीर दुखापत झाली होती.
अलीकडेच तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला होता. ही माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने तिच्या बहिणीसोबत आरोपी पतीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने या दोघींनाही शिवीगाळ करुन त्यांच्याशी अश्लील वर्तन केले होते. पित्याकडूनच मुलीवर होणार्या सततच्या मानसिक व शारीरिक शोषणानंतर तिने कुरार पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थितीत पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशांनतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान पिडीत मुलीची मेडीकल करण्यात आली असून लवकरच आरोपीची मेडीकल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.