माजी आमदार राम पंडागळे यांच्या मुलाची आत्महत्या

मानसिक नैराश्यातून गळाला फास घेऊन जीवन संपविले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – माजी आमदार राम पंडागळे यांचा मुलगा जयेश राम पंडागळे याने रविवारी सायंकाळी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जयेशकडे कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मानसिक नैराश्यातून त्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे.

राम पंडागळे हे माजी आमदार असून दोन वर्षांपूर्वीच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. ते सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत कांदिवलीतील लोखंडवाला परिसरातील पॉश अपार्टमेंटमध्ये राहत होते. जयेश हा त्यांचा मुलगा असून तो मनोरंजन क्षेत्रात कार्यरत होता. त्याला अभिनय क्षेत्रात स्वतचे करिअर करायचे होते. त्यासाठी त्याने स्वतची अष्टविनायक प्रोडेक्शन नावाची निर्मिती संस्था बनविली होती. त्याला गाणी ऐकणे आणि वेगवेगळ्या गाड्या चालविण्याची आवड होती. रविवारी दुपारी दोन वाजता तो त्याच्या बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेला होता. मात्र बराच वेळ होऊन तो रुमच्या बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या आईने त्याला आवाज दिला, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. बराच वेळ झाल्यानंतरही तो प्रतिसाद देत नव्हता. काही वेळानंतर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता जयेशने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

जयेशच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. गेल्या दोन वर्षांपासून त्याच्याकडे काहीच काम नव्हते. त्यामुळे तो मानसिक तणावात होता. त्यातून त्याने नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपविले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. जयेशच्या पालकासह इतर नातेवाईकांची लवकरच पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. रविवारी जयेशच्या आत्महत्येचे वृत्त समजताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page