मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – मालाड येथे ओव्हरटेक केल्याचा जाब विचारला म्हणून आकाश दत्तात्रय माईन या ट्रॅव्हेल्स व्यावसायिक तरुणाची हत्येची घटना ताजी असतानाच सोमवारी अशीच दुसरी घटना भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. विनाकारण ओव्हरटेक करणार्या बाईकस्वाराला जाब विचारला म्हणून बाईकस्वारासह त्याच्या दोन सहकार्यांनी एका २२ वर्षांच्या तरुणाला बेदम मारहाण करुन त्याच्या पोटात चाकूने भोसकले. या हल्ल्यात रिजवान मोहम्मद इस्लाम शेख हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्याविरुद्ध सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी तिन्ही आरोपीविरुद्ध भांडुप पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या तिन्ही आरोपींचा शोध सुरु केला आहे.
भांडुपच्या सोनापूरचे रहिवाशी असलेले मोहम्मद इस्लाम अब्दुल गफार शेख हे त्यांच्या पत्नीसह सहा मुलांसोबत राहतात. त्यांचा मुलांचा एसी रिपेरिंगचा व्यवसाय असून ऑर्डर आल्यानंतर ते संबंधित ठिकाणी कामासाठी जातात. रिझवान हा त्यांचा लहान मुलगा असून त्याला सोमवारी गाढव नाका परिसरात एसी रिपेरिंगची ऑर्डर मिळाली होती. त्यामुळे तो सकाळीच त्याच्या कामासाठी निघून गेला होता. दुपारी तीन वाजता तो काम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी त्याच्या बाईकवरुन निघाला. यावेळी गाढव नाका येथून जंगलमंगल रोडने बाईकवरुन जाणार्या तीन तरुणांनी त्याच्या बाईकला जाणूनबुजून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यांना जाब विचारला असता या तिघांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यापैकी एका त्याच्याकडील चाकूने त्याच्या पोटावर वार केला होता. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. रक्तबंबाळ अवस्थेत तो बाईकवरुन त्याच्या घरी आला. यावेळी त्याच्या वडिलांसह भावाने त्याला तातडीने मुलुंडच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याला नंतर सायन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.
ही माहिती प्राप्त होताच भांडुप पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी सुरु केली होती. यावेळी रिझवानचे वडिल मोहम्मद इस्लाम यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हल्ला करणार्या तिन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसाकडून तपास सुरु असून पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तीन दिवसांपूर्वी याच कारणावरुन मालाड येथे आकाश माईन या तरुणाची एका जमावाने मारहाणीसह दगडाने हल्ला करुन हत्या केली होती. त्यानंतर सोमवारी भांडुप परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती.