चार कोटीच्या विदेशी गांजासह सोन्याची तस्करीचा पर्दाफाश
आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बँकॉक आणि दुबईहून आणलेल्या विदेशी गांजासह सोने तस्करीचा सीमा शुल्क विभाागच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन प्रवाशांना अटक करुन त्यांच्याकडून सुमारे चार कोटीचा विदेशी गांजासह सोने जप्त केले आहेत. त्यात ३ कोटी ४६ लाख रुपयांच्या गांजा तर ६४ लाखांच्या सोन्याचा समावेश आहे. अटकेनंतर या प्रवाशांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
गेल्या काही महिन्यांत विदेशातून सोने आणि ड्रग्ज तस्करीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. विदेशातून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची झडती घेतली जात होती. सोमवारी बँकॉंकहून एक प्रवाशी आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला या अधिकार्यांनी चौकशीसाठी घेतले होते. त्याच्या सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्यांना ३ किलो ४६० ग्रॅम वजनाचा विदेशी गांजाचा साठा सापडला. त्याची किंमत सुमारे ३ कोटी ४६ लाख रुपये इतकी होती. तो ट्रॉली बॅगेतून काही सामान घेऊन जात होता. या बॅगेत काही खाऊचे पॅकेट होते, त्यात त्याने ते गांजा लपवून आणला होता. त्याच्याविरुद्ध नंतर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला या अधिकार्यांनी अटक केली. ही कारवाई सुरु असताना दुबईहून आलेल्या अन्य एका प्रवाशाला या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. हा प्रवाशी दुबईहून सोने घेऊन आला होता. त्याच्या बॅगेतून या अधिकार्यांनी सुमारे ६४ लाखांचे सोने जप्त केले आहेत. सोने तस्करीप्रकरणी त्याच्याविरुद्ध नंतर कारवाई करण्यात आली होती.