मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका कारच्या धडकेने उमाशंकर रोहिणीप्रसाद शुक्ला २९ वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी सौरभ हर्षद सोलंकी या कारचालकाविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
हा अपघात सोमवारी रात्री उशिरा पावणेदोन वाजता जोगेश्वरीतील ओशिवरा, न्यू लिंक रोडच्या लोटस पेट्रोलपंपासमोर झाला. उमाशंकर हा मूळचा मध्यप्रदेशच्या सिंधी, भुईडोलचा रहिवाशी असून तो डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. सोमवारी रात्री तो त्याच्या बाईकवरुन न्यू लिंक रोडवरुन जात होता. ही बाईक लोटस पेट्रोलपंपाजवळ येताच एका भरवेगात जाणार्या कारने त्याच्या बाईकला धडक दिली होती. त्यात उमाशंकर हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉ. शिवम यांनी मृत घोषित केले. ही माहिती नंतर हॉस्पिटलमधून ओशिवरा पोलिसांना देण्यात आली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
घटनास्थळी गेल्यानंतर रिक्षाचालक इम्रान हरुण मलिक या रिक्षाचालकाने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मनोज रमेश सानप या पोलीस शिपायाच्या तक्रारीवरुन ओशिवरा पोलिसांनी कारचालक सौरभ सोलंकीविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून बाईकस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर सौरभ सोलंकी याला पोलिसांनी अटक केली. तो रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करत असून सध्या गोरेगाव येथील शास्त्रीनगर, दिव्या-ज्योती अपार्टमेंटमध्ये राहतो. अपघाताची माहिती उमाशंकरचे वडिल रोहिणीप्रसाद शुक्ला, मित्र संदीप शुक्ला आणि बहिण मिना शुक्ला यांना देण्यात आली आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केला जाणार आहे.