ज्वेलर्स व्यापार्याची पोलीस दाम्त्याकडून साडेपाच लाखांची फसवणुक
पोलीस अधिकार्यासह पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ मार्च २०२४
मुंबई, – पत्नीच्या पोल्ट्री फार्म व्यवसायासाठी घेतलेल्या पैशांसह व्याजाच्या सुमारे साडेपाच लाखांचा अपहार करुन एका व्यापार्याची पोलीस अधिकार्यासह त्याच्या पत्नीने फसवणुक केल्याची घटना ऑपेरा हाऊस परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी या पोलीस अधिकार्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध डी. बी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. उमेश भानुदास सपकाळ आणि रुपल उमेश सपकाळ अशी या दोघांची नावे असून यातील उमेश सकपाळ हे मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. त्यामुळे या दोघांची लवकरच पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
प्रकाश चिमनलाल शेठ हे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मलबार हिल येथील रिज रोड, सुलसा अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा ऑपेरा हाऊस येथे हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांचा कमिशनवर खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे पोलीस उपनिरीक्षक रणजीत गंगाधर कासले हे परिचित असून ते पूर्वी डी. बी मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत होते. नंतर त्यांची मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात बदली झाली होती. जानेवारी २०२० रोजी त्यांना रणजीत कासले यांनी फोन करुन त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश सपकाळ यांचा पोल्ट्री फार्म व्यवसाय असून या व्यवसायाची जबाबदारी त्यांची पत्नी रुपल सपकाळ यांच्यावर आहे. याच व्यवसायसाठी त्यांना अल्प कालावधीत पाच लाखांची आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे त्यांनी उमेश सपकाळ यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. यावेळी त्यांनी त्यांना त्यांची पत्नी रुपल सपकाळ हिच्या नावाने हा व्यवसाय सुरु केल्याचे सांगून त्यांना दोन महिन्यांसाठी पाच लाखांची गरज असल्याचे सांगितले.
उमेश सपकाळ हे पोलीस खात्यात असल्याने त्यांनी त्यांना पाच लाखांची मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या ऑपेरा हाऊस येथे कायदेशीर करार झाल्यानंतर त्यांनी रुपल सपकाळ यांच्या बँक खात्यात पाच लाखांची रक्कम ट्रान्स्फर केली होती. ही रक्कम दिल्यानंतर त्यांच्याकडून त्यांना दोन महिन्यांचे २१ हजार ६६६ रुपयांचे व्याज देण्यात आले होते. मात्र नंतर त्यांनी व्याजासह मुद्दल रक्कम दिली नाही. वारंवार विचारणा करुनही त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रकाश शेठ यांच्याकडे काही महिन्यांची मुदत मागून घेतली होती. मात्र दिलेल्या मुदतीत पैसे परत केले नाही. सपकाळ यांच्याशी व्यवहार न पटल्याने त्यांनी रणजीत कासले यांच्या मदतीने त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्यांनी त्यांना साडेपाच लाखांचा एक धनादेश दिला होता. मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता.
सतत पैशांची मागणी होत असल्याने सपकाळ पती-पत्नीने त्यांना पैसे परत करण्यास नकार देत त्यांच्याविरुद्ध पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्याची धमकी दिली होती. त्यांची लेखी माफी मागितली नाहीतर परिणाम वाईट होतील, माझे पती पोलीस असल्याचे सांगून ते तुम्हाला काय करु शकतात, तुम्हीच विचार करा. महाराष्ट्रात कोठेही पोलीस केसमध्ये त्यांना अडकावू शकतात, तसेच त्यांच्यावर सावकारी केस दाखल करण्याची धमकीवजा इशारा रुपल सपकाळ यांनी दिली होती. या प्रकारानंतर ते प्रचंड घाबरले आणि त्यांनी पोलीस उपायुक्तांना पत्राद्वारे उमेश सपकाळ आणि रुपल सपकाळ यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत डी. बी मार्ग पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर उमेश सपकाळ आणि त्यांची पत्नी रुपल सपकाळ यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असूून लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.