दरोड्यासाठी घातक शस्त्रांसह आलेल्या चौकडीला अटक

वांद्रे पोलिसांची कारवाई; चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – दरोड्यासाठी घातक शस्त्रांसह आलेल्या एका चौकडीला वांद्रे पोलिसांनी अटक केली. सद्दाम मेहबूबउल्ला सिद्धीकी ऊर्फ लल्लन, समीर अमजद शेख ऊर्फ समीर डॉन, सागर रामसिंगर सोनार ऊर्फ थापा आणि अमीर सुभान खान ऊर्फ धुर्‍या ऊर्फ गोर्‍या अशी या चौघांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, एक जिवंत काडतुस, एक चाकू, गुप्ती, तलवार, लाल मिरचीची पूड आदी मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान त्यांचे दोन सहकारी पळून गेले असून त्यांचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. अटकेनंतर चारही आरोपींना वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

वांद्रे परिसरात काहीजण दरोड्याच्या उद्देशाने घातक शस्त्रांसह येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वांद्रे पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी सायंकाळपासून वांद्रे येथील लालमिठ्ठी, नर्गिस दत्त नगर झोपडपट्टीजवळील यु ब्रिजखाली परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. सायंकाळी पावणेआठ वाजता तिथे सहाजण आले होते. या सर्वांची हालचाल संशयास्पद वाटत होती, त्यांच्या संभाषणावरुन ते सर्वजण तिथे दरोड्याच्या उद्देशाने आल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या आरोपींना पळून जाण्याची कुठलीही न देता पोलिसांनी सहापैकी चौघांना शिताफीने ताब्यात घेतले तर त्यांचे दोन सहकारी पोलिसांना धक्काबुक्की करुन पळून गेले होते. ताब्यात घेतलेल्या चौघांच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक पिस्तूल, गुप्ती, चाकू आणि तलवारीसारखे घातक शस्त्रे सापडले. चौकशीत या चौघांनी ते सर्वजण तिथे दरोड्याच्या उद्देशाने आल्याची कबुली दिली. चौकशीदरम्यान चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील सद्दाम सिद्धीकी याच्याविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात सतरा, समीर शेख व अमीर खानविरुद्ध दोन तर सागर सोनारविरुद्ध एका गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या चौघांनाही गुरुवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांचे दोन सहकारी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page