बँकेत गहाण ठेवलेल्या गाळ्याची खरेदी-विक्री करुन फसवणुक
एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बँकेत गहाण ठेवलेल्या व्यावसायिक गाळ्याची खरेदी-विक्री करुन एका व्यावसायिकाची तिघांनी सुमारे २९ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुरेश पारसचंद बैद, प्रमिला प्रदीप बैद आणि प्रियांक प्रदीप बैद अशी या तिघांची नावे असून या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
शैल भुशन मेहता हे व्यावसायिक असून गोरेगाव येथील जैन मंदिराजवळील जवाहरनगर रोड क्रमांक एक परिसरात राहतात. त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी व्यावसायिक गाळ्याची गरज होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान गेल्या वर्षी जून महिन्यांत त्यांच्या परिचित मित्रांकडून त्यांची बैद कुटुंबियांशी ओळख झाली होती. त्यांच्या मालकीचा मालाड येथील महिला कॉलेज, साई झरुखा सोसायटीमध्ये एक व्यावसायिक गाळा होता. या गाळ्याची त्यांना विक्री करायची होती. गाळ्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी तो गाळा खरेदीसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी त्यांना जून २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत टप्याटप्याने २९ लाख रुपये दिले होते. मात्र पेमेंट करुनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. याच दरम्यान त्यांना या गाळ्यावर बैद कुटुंबियांनी एका बँकेतून कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड न करता परस्पर गाळ्याच्या खरेदी-विक्रीचा त्यांच्याशी करुन त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांच्यातील व्यवहार रद्द करुन त्यांच्याकडे गाळ्यासाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी ही रक्कम परत केली नाही. या प्रकारानंतर त्यांनी मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सुरेश बैद, प्रमिला बैद आणि प्रियांक बैद या तिघांविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिन्ही आरोपींना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांनी याच गाळ्याचा खरेदी-विक्रीचा व्यवहार इतर कोणासोबत केला होता का याचाही पोलीस तपास करत आहेत.