पाच अल्पवयीन मुलींचा विनयभंगप्रकरणी चौघांना अटक

अंधेरी, जुहू, परळ व कुर्ल्यातील घटना; एकाचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – मुंबई शहरात पाच वेगवेगळ्या घटनेत पाच अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पाच स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन चार आरोपींना अटक केली तर एका आरोपीचा शोध सुरु आहे. या पाचही घटना अंधेरी, जुहू, परळ आणि कुर्ला परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर चारही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.

पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला ३४ वर्षांची असून ती अंधेरी येथे राहते. तिला अकरा वर्षांची मुलगी असून ती एका खाजगी शाळेत शिकते. बुधवारी दुपारी बारा वाजता तिची मुलगी घराजवळील शिकवणीवरुन येत होती. यावेळी तिथे भाडेकरु म्हणून राहणार्‍या राजेंद्रकुमार नावाच्या एका २४ वर्षांच्या तरुणाने तिचा हात पकडून तिच्याशी अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि घरी पळून गेली. घडलेला प्रकार तिने तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर राजेंद्रकुमारविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.

दुसरी घटना परळ परिसरात घडली. सहा वर्षांची बळीत मुलगी तिच्या पालकांसोबत राहते. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजती ही मुलगी शाळेत जात होती. यावेळी याच परिसरातील एका इमारतीच्या सुरक्षारक्षक निरज वर्मा याने तिला जवळ बोलावून मिठी मारली. तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकार तिच्या आईसह अन्य एका शिक्षकाने पाहिल्यानंतर त्यांनी त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मुलीच्या आईने भोईवाडा पोलिसात तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होातच आरोपी सुरक्षारक्षक निरज वर्मा याला पोलिसांनी अटक केली.

तिसर्‍या गुन्ह्यांत एका सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. ही मुलगी आणि आरोपी एकाच इमारतीमध्ये राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. २४ सप्टेंबरला दुपारी पाऊणच्या सुमारास बळीत मुलगी एकटी असल्याचा फायदा घेऊन आरोपीने तिला चॉकलेट देण्याचा बहाणा करुन तिला त्याच्या घरी नेण्याचा प्रयत्न केला होता. तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार देऊनही त्याने तिच्याशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी तिने तिच्या वडिलांना सांगितला होता. ही माहिती ऐकून त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी कुर्ला पोलिसात आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी पळून गेला. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

अन्य एका घटनेत एका पंधरा वर्षांच्या मुलीला अश्‍लील मॅसेज पाठवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी देवानंद नावाच्या एका ३६ वर्षांच्या आरोपीस सहार पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पंधरा वर्षांची ही मुलगी अंधेरी परिसरात राहते. १५ ऑक्टोंबर आणि १६ ऑक्टोंबरला तिच्या मोबाईलवर देवानंद या आरोपीने काही अश्‍लील मॅसेज पाठवून तिच्याशी जवळीक साधून तिचा विनयभंग केला होता. या मॅसेजबाबत तिने तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी सहार पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीस गुरुवारी रात्री त्याच्या राहत्या घरातून अटक केली.

जुहू येथे एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित ३३ वर्षांच्या आरोपीने जबदस्तीने लैगिंक अत्याचाराचा प्रयत्न केला होता. बळीत मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत त्याने बळीत मुलीला त्याच्या घरी आणून तिच्याशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. तसेच तिचे कपडे काढून तिच्यावर जबदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कोणालाही सांगितला तर तिचे अपहरण करण्याची धमकीच त्याने तिला दिली होती. बदनामीसह जिवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र आरोपीकडून सतत होणार्‍या मानसिक छळाला कंटाळून अखेर तिने गुरुवारी १७ ऑक्टोंबरला जुहू पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page