बाबा सिद्धीकी हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकरच
घरासह कार्यालयाची रेकीचे फोटो शुभमला पाठविल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादीचे नेते झियाउद्दीन अब्दुल रहिम सिद्धीकी ऊर्फ बाबा सिद्धीकी यांची विष्णोई टोळीकडून झाली असली तरी या संपूर्ण कटात शुभम रामेश्वर लोणकर हाच असल्याचे अटक आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. शुभमनेच हा कट तडीस नेण्यासाठी संपूर्ण योजना बनवून प्रत्येकाला त्याची भूमिका समजावून सांगितली होती. शुभमच्या सांगण्यावरुन तिन्ही शूटरच्या बँक खात्यात पाच लाख रुपये ट्रान्स्फर झाले होते. त्यांच्या बँक स्टेटमेंटमधून हा व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. हा मुंबई पोलिसांसाठी एक महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. दुसरीकडेच बाबा सिद्धीकी यांच्या घरासह कार्यालयाची रेकी केल्यानंतर तिन्ही शूटरने त्याचे फोटो आणि व्हिडीओ शुभमलाच पाठविले होते. त्यामुळे शुभम हाच या कटातील मुख्य आरोपी असल्याचा दावा आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर खंडणीविरोधी पथकाने आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. त्यात गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप या दोन शूटरसह प्रविण रामेश्वर लोणकर, हरिशकुमार बालकराम निशाद, नितीन गौतम सप्रे, संभाजी किशन पारबी, राम फुलचंद कनोजिया, प्रदीप तोंबर आणि चेतन दिलीप पारधी यांचा समावेश आहे. याच गुन्ह्यांत ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलाशांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हत्येत सहभागी होण्यासाठी शूटरच्या बँक खात्यात पाच लाख रुपये पाठविण्यात आले होते. ही रक्कम शुभमने पाठविली होती. त्यांच्या बँक खात्याचा तपशील पाहिल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम आल्याचे दिसून आले आहे. हत्येपूर्वी तिन्ही शूटरकडून बाबा सिद्धीकी यांच्या घरासह कार्यालयाची दोन ते तीन वेळा रेकी करण्यात आले होते. त्याचे त्यांनी फोटोसह व्हिडीओ काढले होते. ते फोटो आणि व्हिडीओ नंतर शुभमला पाठविण्यात आले होते. पाचही आरोपी एकमेकांच्या परिचित असून संपर्कात होते. या हत्येच्या कटाचा शुभम हाच मुख्य आरोपी असून त्याला मोहम्मद जिशान अख्तर याने मदत केली होती. मोहम्मद जिशानने तिन्ही शूटरची शुभमशी ओळख करुन दिली होती. गोळीबारादरम्यान काही चूक होऊ नये म्हणून त्यांना गोळीबाराचा सराव करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर या तिन्ही शूटरने गोळीबाराचा सराव केल्याची कबुली दिली आहे.
नितीन सप्रे आणि राम कनोजिया हे शुभमच्या संपर्कात होते. त्याच्या आदेशाची अंमलबजावणी करत होते. शुभमच्या सांगण्यावरुन तिन्ही शूटरला नितीन आणि राम यांनी शस्त्रे पुरविली होती. मुख्य शूटर म्हणून शिवकुमार गौतम आणि धर्मराज कश्यप यांची नियुक्ती करण्यात आली तर गुरमेल याला त्यांना मदत करण्यास सांगण्यात आले होते. नितीन आणि राम हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्न, घातक शस्त्रे बाळगणे व इतर गुन्ह्यांची नोंद आहे. २०१५ साली नितीनसह संभाजी पारधी आणि चेतन पारधी यांनी सोमनाथ पारधी या व्यक्तीची हत्या केली होती. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांची कारागृहात राम कनोजियाशी ओळख झाली होती. २०१७ साली जामिनावर बाहेर आल्यानंतर ते पाचजण एकत्र काम करु लागले असे तपासात उघडकीस आले. अटक आरोपी शुभमच्या सांगण्यावरुन काम करत होते. त्यामुळे या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकर हाच असल्याचे आतापर्यंतच्या चौकशीतून उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत शुभमसह मोहम्मद जिशान अख्तर आणि शिवकुमार गौतम या तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.