शेअरमार्केटच्या गुंंतवणुकीच्या बहाण्याने फसवणुकीचा प्रयत्न
फसवणुकीची रक्कम मिळविण्यात एमएचबी पोलिसांना यश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – चांगला परतावा देतो असे सांगून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका व्यक्तीची अज्ञात व्यक्तीने फसवणुक केली, मात्र फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच सर्व रक्कम परत मिळविण्यात एमएचबी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अज्ञात सायबर ठगांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.
यातील तक्रारदार दहिसर परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांना काही अज्ञात सायबर ठगांनी शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांनी विविध शेअरसाठी सुमारे एक लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र या गुंतवणुकीवर कुठलाही परतावा न देता या ठगांनी त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईनसह एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश किरपेकर, पोलीस हवालदार रविंद्र पाटील, महिला पोलीस शिपाई सोनाली इलग यांनी तपास सुरु केला होता.
ही रक्कम ज्या बँक खात्यात जमा झाली होती, त्या बँक खात्याची माहिती मिळवून पोलिसांनी संबंधित बँकेशी ईमेलद्वारे संपर्क साधला होता. त्यांच्या नोडल अधिकार्यांनपा घडलेला प्रकार सांगून संबंधित बँक खात्यातील सर्व व्यवहार थांबविण्याची विनंती केली होती. त्यानंतर या अधिकार्यांनी ते बँक खाते गोठवून बँकेत जमा झालेली रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. अशा प्रकारे फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच एमएचबी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश किरपेकर, पोलीस हवालदार रविंद्र पाटील, महिला पोलीस शिपाई सोनाली इलग यांनी तातडीने हालचाल करुन फसवणुकीची ही रक्कम परत मिळविण्यात यश मिळविले. या कामगिरीबाबत या पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह तक्रादारांनी आभार व्यक्त केले आहे.