मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – मालाड परिसरातील एका व्यावसायिकाच्या घरी चोरी केल्याप्रकरणी नितीशकुमार रामआशिष साह या नोकराला अखेर मालाड पोलिसांनी अटक केली. घरातील सफाई करताना नितीशकुमारने कपाटातील पंधरा लाख तीस हजार रुपयांच्या सोन्याच्या विविध दागिन्यांवर हातसफाई करुन पलायन केले होते. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याच्याकडून चोरीचे काही दागिने हस्तगत केल्याचे बोलले जाते.
मनन कमल पोदार हे मलाडच्या मार्वे रोड, शांतीसदन अपार्टमेंटमध्मे राहतात. त्यांची लिपीन एक्सपोर्टस प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून ही कंपनी अबे्रसिव्ह पावडर तयार करते. कामानिमित्त ते त्यांच्मा वडिलांसोबत दिवसभर बाहेर असतात तर त्यांची आई घरी असते. तिची देखभाल तसेच घरकामासाठी मदत म्हणून त्यांनी नितीशकुमारला त्यांच्याकडे घरगडी म्हणून कामाला ठेवले होते. जुलै २०२३ पासून तो त्यांच्याकडे कामाला होता. दिवसभर काम करुन तो किचनमध्मे झोपत होता. चार महिने काम केल्यानंतर तो नोव्हेंबर २०२३ रोजी काम सोडून त्याच्या बिहार येथील मधुबनी, फिरोजगढ येथील गावी निघून गेला होता. त्यानंतर त्यांनी रामवतार नावाच्या एका व्यक्तीला कामावर ठेवले होते. १ जुन २०२४ रोजी नितीशकुमार हा त्यांच्या घरी आला आणि त्याने त्यांना पुन्हा कामावर ठेवण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला पुन्हा कामावर ठेवले होते.
३० जुलैला नितीशकुमार हा त्यांच्या घरातून अचानक कोणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. दोन दिवस प्रयत्न करुनही त्याचा मोबाईल बंद येत होता. तो पुन्हा नोकरी सोडून निघून गेला असावा असा विचा करुन त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. शुक्रवारी ४ ऑक्टोंबर २०२४ रोजी त्यांनी कपाटातील लॉकर उघडले होते. यावेळी त्यांना लॉकरमधील १५ लाख ३० हजार रुपयांचे विविध सोने-चांदी आणि हिरेजडीत दागिने दिसून आले नाही. त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना दागिन्यांविषयी विचारणा केली, मात्र त्यांना दागिन्यांबाबत काहीही माहित नव्हते. त्यांनी घरासह कपाटात सर्वत्र दागिन्यांचा शोध घेतला, मात्र त्यांना कुठेच दागिने सापडले नाही. या कालावधीत त्यांच्या घरी रामवतार आणि नितीशकुमार वळगता कोणीही आले नव्हते. त्यात नितीशकुमार हा अचानक नोकरी सोडून निघून गेला होता.
त्यानेच ही चोरी करुन कोणालाही काहीही न सांगता पलायन केले असावे असा संशय व्यक्त करुन त्यांनी घडलेला प्रकार मालाड पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नितीशकुमारविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली होती. तो त्याच्या बिहार येथील गावी पळून गेल्याची शक्यता असल्याने तिथे एक टिम पाठविण्यात आली होती. अखेर पळून गेलेल्या नितीशनकुमारला तीन दिवसांपूर्वी मालाड पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.