कोव्हीड मेडीकल कॅम्पच्या नावाने डॉक्टरची फसवणुक
३५ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी महिला डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – शिर्डींच्या साई संस्थानासह साईबाबा हॉस्पिटलमध्ये ट्रस्टी असल्याची बतावणी करुन मोफत कोव्हीड मेडीकल कॅम्पच्या नावाने एका महिला डॉक्टरने ४७ वर्षांच्या डॉक्टरची फसवणुक केल्याचा अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉक्टरच्या तक्रारीवरुन सुमन बंडोपध्याय ऊर्फ डॉ. सुमनजी या महिला डॉक्टरविरुद्ध आंबोली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत तिची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
दिपक विश्वनाथ चर्तुवैदी हे व्यवसायाने डॉक्टर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील आझादनगर, मैत्री अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचे अंधेरीतील सुंदरवन कॉम्प्लेक्स, एस्टनन इमारतीमध्ये अमाया क्लिनिक नावाचा एक दवाखाना आहे. एप्रिल २०२० रोजी त्यांची सुमन बंडोपध्याय हिच्याशी ओळख झाली होती. तिने ती शिर्डीच्या साई संस्थान आणि साईबाबा हॉस्पिटलमध्ये ट्रस्टी म्हणून असल्याचे सांगितले होते. तिने त्यांचा विश्वास संपादन करुन साईधाम फाऊंनडेशन या संस्थेमार्फत मोफत कोव्हीड मेडीकल तपासणी कॅम्पसहीत ओपीडी, मोफत जेवण, पाणी, सॅनिटायझर, ग्लोज, फेसशिल्ड, फेसमास्क आदीचे कॅम्प आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला होता. या वैद्यकीय कॅम्पमुळे अनेक गरजू लोकांना मदत मिळणार होती. त्यातून त्यांना साईधाम फाऊंनडेशनतर्फे काही पेमेंट देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच या वैद्यकीय कॅम्पचे फोटो, व्हिडीओचा प्रचारासाठी वापर करुन त्याचे मार्केटिंग केले. त्याच्या माध्यमातून विविध लोकांकडून आर्थिक मदत घेऊन एका बँक खात्यात जमा केली होती.
सुमारे ३५ लाख रुपये जमा होताच तिने दिपक चर्तुवैदी यांच्याकडून ती रक्कम घेऊन या रक्कमेचा परस्पर स्वतच्या फायद्यासाठी केला होता. याबाबत विचारणा करुनही तिने मोफत कोव्हीड मेडीकल कॅम्प आयोजित न करता कॅम्पसाठी जमा झालेल्या पैशांचा अपहार करुन ही फसवणुक केली होती. गेल्या तीन वर्षांत तिच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही तसेच तिला दिलेले सुमारे ३५ लाख रुपये तिने परत केले नाही. ३ एप्रिल २०२० ते २ मे २०२४ या कालावधीत फसवुणकीचा हा प्रकार घडला होता. डॉ. सुमनकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच दिपक चर्तुवैदी यांनी आंबोली पोलिसात लेखी अर्जाद्वारे डॉ. सुमन बडोपध्याय हिच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शुक्रवार १८ ऑक्टोंबरला तिच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच तिची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर तिच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.