बेल वाजविली म्हणून आठ वर्षांच्या मुलीला मारहाण
विक्रोळीतील घटना; ५२ वर्षांच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – घराची बेल वाजविली म्हणून एका आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला तिच्याच शेजारी राहणार्या ५२ वर्षांच्या व्यक्तीने गालात चार ते पाच जोरात चापट लगावल्याची घटना विक्रोळी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रकाश श्रावण अहिरे या आरोपीविरुद्ध विक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. इतक्या क्षुल्लक कारणावरुन आठ वर्षांच्या मुलीला मारहाण झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
३१ वर्षांची तक्रारदार महिला ही विक्रोळीतील टागोरनगर परिसरात राहते. ती घरकाम तर तिचे पती बिगारी कामगार आहेत. तिला तीन मुली असून लहान मुलगी आठ वर्षांची आहे. तिला फिटचा आजार असून अनेकदा तिला फिट येते. तोंडाला फेस येऊन तिला अचानक ताप येऊन आकडीचा त्रास होतो. तिच्यावर सध्या औषधोपचार सुरु आहेत. ती विक्रोळीतील महानगरपालिकेच्या शाळेत चौथी इयत्तेत शिकते. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता ती शाळेतून घरी आली आणि तिच्या मैत्रिणीसोबत घरासमोरच खेळत होती. सव्वासहा वाजता ती रडत घरी आली होती. त्यामुळे तिच्या आईने तिला रडण्याचे कारण विचारले होते. यावेळ तिने त्यांच्याच शेजारी राहणार्या प्रकाश अहिरे याने तिला चार ते पाच चापट मारल्याचे सांगितले. त्यामुळे तिने घाबरुन परिधान केलेल्या कपड्यातच लघवी केली होती. तिने त्यांच्या दाराची बेल वाजविली होती, त्याचा राग आल्याने प्रकाशने तिला मारहाण केली होती. त्यामुळे ती तिच्या मुलीसोबत त्याच्या घरी गेली होती. तिने जाब विचारल्यानंतर त्याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. तसेच तिला त्याच्या घरातून निघून जाण्यास सांगून तिला शिवीगाळ केली होती.
या घटनेनंतर ती प्रचंड घाबरली होती. तिच्या पयाला मुंग्या येऊ लागल्याने तिने तिला विक्रोळीतील आंबेडकर हॉस्पिटलमध्ये नेले होते. तिथे उपचार केल्यानंतर तिने विक्रोळी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी प्रकाश अहिरे याच्याविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी प्रकाश अहिरेविरुद्ध ११५ (२), १३१, ३५१ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ७५ अल्पवयीन न्याय कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच आरोपीची पोलिसाकडून चौकशी होणार आहे.