विनयभंगासह पोक्सोच्या गुन्ह्यांतील पळपुळ्या आरोपीस अटक
आर्थर रोड जेलमध्ये नेताना शुक्रवारी पळून गेला होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – विनयभंगासह पोक्सोच्या गुन्ह्यांतील पळपुट्या आरोपीस खार पोलिसांनी काही तासांत अटक केली. अमोल पांडुरंग शेलार असे या ३८ वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी एन. एम जोशी मार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले.
अमोल हा खार परिसरात राहत असून त्याच्याविरुद्ध खार पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत एक गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडी आर्थर रोड जेलमध्ये न्यायबंदी होता. शुक्रवारी १८ ऑक्टोंबरला त्याला ताडदेव येथील जे कंपनीतील पथक विशेष सेशन कोर्टात सुनावणीसाठी घेऊन गेले होते. सुनावणी संपल्यानंतर त्याला पोलीस बंदोबस्तात आर्थर रोड जेलमध्ये नेण्यात येत होते. यावेळी त्याने संबंधित पोलीस पथकाला धक्काबुक्की करुन पलायन केले होते. त्याचा पोलिसांनी पाठलाग केला, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. या घटनेनंतर एन. एम जोशी मार्ग पोलिसांत अमोल शेलार याच्याविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी त्याचा शोध घेत होते.
ही शोधमोहीम सुरु असताना अमोल हा खार येथील राहत्या घरी त्याच्या आईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती खार पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, पोलीस निरीक्षक वैभव काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनमंत कुंभारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज वैद्य, पोलीस हवालदार भरत काच्चे, दिनेश शिर्के, आनंद निकम, पोलीस शिपाई अजीत जाधव यांनी शनिवारी पहाटे खारदांडा परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. ठरल्याप्रमाणे पहाटे अमोल तिथे आला होता, यावेळी त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी अटक केली. ही माहिती नंतर खार पोलिसांकडून वरिष्ठांना देण्यात आली होती. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी एन. एम जोशी मार्ग पोलिसाकडे सोपविण्यात आले.