बाबा सिद्धीकी हत्येसाठी शस्त्रे पुरविणार्या भंगार विक्रेत्याला अटक
अटक आरोपींची संख्या दहा; आरोपीला २६ ऑक्टोंबरपर्यंत कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादीचे नेते झियाउद्दीन अब्दुल रहिम सिद्धीकी ऊर्फ बाबा सिद्धीकी यांच्या हत्येत तिन्ही शूटरला मुंबई शहरात शस्त्रे पाठविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणार्या एका भंगार विक्रेत्याला बेलापूर येथून गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. भगवतसिंग ओमसिंग असे या ३२ वर्षांच्या आरोपी विक्रेत्याचे नाव असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने शनिवार २६ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेनंतर बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता दहावर गेली आहे. या गुन्ह्यांत शिवकुमार गौतम, मोहम्मद जिशान अख्तर आणि शुभम रामेश्वर लोणकर या तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
१२ ऑक्टोंबरला वांद्रे येथे बाबा सिद्धीकी यांची हत्या झाली होती. याप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होताच त्याचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. हा तपास हाती येताच गोळीबार करुन पळून जाणार्या गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप या दोन शूटरसह प्रविण रामेश्वर लोणकर, हरिशकुमार बालकमराम निशाद, नितीन गौतम सप्रे, संभाजी किशन पारबी, राम फुलचंद कनोजिया, प्रदीप दत्तू ठोंबरे, आणि चेतन दिलीप पारधी या नऊजणांना पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींकडून पोलिसांनी तीन पिस्तूल, तीस जिवंत काडतुसे, तीन मॅगझीन, पाच मोबाईल, दोन आधारकार्ड आदी मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या आरोपींच्या चौकशीतून भगवतसिंग याचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना रविवारी सकाळी अकरा वाजता भगवतसिंगला बेलापूर येथून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली. मेडीकलनंतर त्याला दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला शनिवार २६ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासात भगवतसिंग हा नवी मुंबईतील बेलापूर, पोलीस कॉलनी रोड, सेक्टर एकच्या प्लॉट क्रमांक सातमध्ये राहत असून त्याचे तिथेच भंगाराचे दुकान आहे. पूर्वी तो वांद्रे येथे राहत होता. यावेळी एका वॉण्टेड आरोपीच्या ओळखीने राम कनोजियाच्या संपर्कात आला होता. मे महिन्यांत त्याने त्याला उदयपूरला पाठविले होते. तेथून तो हत्येसाठी शस्त्रे घेऊन आला होता. यावेळी एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. शस्त्रे आणण्यासाठी त्याला काही पैशांचे आमिष दाखविण्यात आले होते. त्याने या कटातील एक आरोपी राम कनोजिया याच्या राहण्याची व्यवस्था करुन गुन्ह्यांतील शस्त्रे मुंबईपर्यंत पोहचविण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. यापूर्वी अटक केलेल्या आरोपींसोबत त्याने शस्त्रांच्या डिलीव्हरी केली होती. त्यांनी ते शस्त्रे कोठून आणली, त्यांना ते शस्त्रे कोणी दिले याचा त्याच्याकडून चौकशी केली जाणार आहे. या गुन्ह्यांतील पाहिजे आरोपीच्या तो संपर्कात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बाबा सिद्धीकी यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहाराची त्याची माहिती होती. त्यामुळे त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली होती. त्याच्या चौकशीसाठी जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य करुन किल्ला कोर्टाने भगवतसिंगला २६ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.