सोशल मिडीयावर पाठलाग करुन महिलेचा मानसिक शोषण
साकिनाका येथील घटना; माजी सहकार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सोशल मिडीयावर पाठलाग करुन एका महिलेचा मानसिक शोषण केल्याप्रकरणी माजी सहकार्याविरुद्ध साकिनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माहरुफ कोटीयान असे या सहकार्याचे नाव असून त्याची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून माहरुफ हा इंटाग्राम, फेसबुक आणि मोबाईलच्या माध्यमातून तक्रारदार महिलेचा मानसिक छळ करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
३९ वर्षांची तक्रारदार महिला ही तिच्या आठ वर्षांच्या मुलीसोबत साकिनाका परिसरात राहते. ऑक्टोंबर २०१२ पासून ती विक्रोळीतील एका खाजगी कंपनीत केमिकल इंजिनिअर म्हणून कामाला आहे तर तिचे तिचे पती बंगलोर शहरात नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. तिच्या विभागात दिडशेहून अधिक कर्मचारी आहेत. विविध प्रशिक्षणादरम्यान तिची ओळख माहरुफ कोटीयानशी झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. ऑक्टोंबर २०२३ रोजी त्याने तिला इंटाग्रामवर रिक्वेस्ट पाठविली होती. तो तिच्या परिचित असल्याने तिने त्याची रिक्वेस्ट स्विकारली होती. त्यानंतर तो तिला सतत मॅसेज पाठवत होता. याच दरम्यान त्याने तुम्ही जॉंब लिड करणार नसाल तर मीदेखील नोकरी सोडणार असल्याचे मॅसेज पाठविला होता. त्यानंतर तो तिला तिच्यावर प्रेम असल्याचे मॅसेज पाठवू लागला. ते मॅसेज पाहिल्यानंतर तिने त्याला ब्लॉक केले होते. त्यानंतर तो तिला वेगवेगळ्या मोबाईलवरुन कॉल करुन त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. माझा कॉल का घेत नाही, मला ब्लॉक का केले आहेस, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे असे सांगून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी तिने त्याला स्पष्टपणे नकार देताना तिला कॉल करु नकोस असा दम दिला होता. तरीही तो तिला कॉल करुन मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत होता.
१५ ऑक्टोंबरला त्याने तिला व्हॉटअपवर एक मॅसेज पाठवून कंपनीने त्याला पुन्हा नोकरीची ऑफर दिली आहे. त्यामुळे मी पुन्हा कंपनी जॉईन करत असल्याचे सांगितले. मात्र तिने त्याच्या मॅसेजला काहीच उत्तर दिले नाही. तरीही तो तिचा इंटाग्राम, फेसबुक आणि मोबाईलच्या माध्यमातून सतत पाठलाग करत होता. त्याच्याकडून होणार्या त्रासाला कंटाळून तिने साकिनाका पोलिसात माहरुफ कोटीयानविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध ७८ (२) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.