विविध कंपनीच्या सहा विमानात बॉम्ब असल्याचा बोगस मेल

विमानाची तपासणीनंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – विमानात बॉम्ब ठेवल्याचा ट्विट आणि मेलचे सत्र सुरुच असून शनिवारी सकाळी इंडिगो, विस्तारा, स्पाईस जेट आणि अलिसन्सच्या सहा विमानात बॉम्ब असल्याचा बोगस मेल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता, मात्र या सहाही विमानाची कसून तपासणी केल्यानंतर त्यात काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस येताच सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला होता. दरम्यान या घटनेनंतर विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बोगस मेल पाठवून तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर आणि गुन्हे शाखेकडून संमातर तपास सुरु आहे.

शनिवारी पोलीस हवालदार चौरे हे विमानतळ येथे पीटर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. दुपारी दिड वाजता त्यांना सीआयएसएफ मुख्य नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ यांनी कॉल करुन त्यांच्या ट्विटर मेलवर एक संदेश आला आहे. त्यात विस्तारा आणि इंडिगोच्या दोन विमानात बॉम्ब ठेवल्याचे नमूद करण्यात आले होते. या धमकीच्या मेलनंतर विमानतळ पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथकातील अधिकारी श्‍वान पथकासह घटनास्थळी रवाना झाले होते. यावेळी इंडिगोच्या दोन जेहादला, विस्ताराचा सिंगापूर, उदयपूर, स्पाईस जेटच्या दर्बंगा, अलियन्सच्या सिंधुदुर्ग अशा सहाही विमानांना तातडीने मुंबई डोमेस्टिक विमानतळावर उतरविण्यात आले होते. सर्व प्रवाशांना बाहेर काढून संपूर्ण विमानासह सामानाची तपासणी करण्यात आली होती. मात्र तिथे काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे बॉम्ब असल्याचा तो मेल बोगस असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा मेल कोणी पाठविला, तो मेल कोठून आला याचा पोलीस तपास करत आहे. याकामी स्थानिक पोलिसांना गुन्हे शाखा आणि सायबर सेल पोलीस मदत करत असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page