मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका डंपरने चार वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेसह चारजण जखमी झाले. जखमी दोघांवर सांताक्रुजच्या व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत तर दोघांना प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले. याप्रकरणी उदयनारायण रामकिसन चौधरी या डंपरचालकाविरुद्ध बीकेसी पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला होता.
हा अपघात शनिवारी सकाळी पावणेआठ वाजता सांताक्रुज येथील सांताक्रुज-चेंबूर लिंक रोड, हंसभुगा जंक्शनजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. इम्रान अहमद नूरआलम खान हा मूळचा उत्तरप्रदेशच्या संत कबीर नगर, खलीलाबादचा रहिवाशी असून सध्या गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात राहतो. गेल्या दोन वर्षांपासून तो त्याच्या भावासोबत टॅक्सीचालक म्हणून काम करतो. ऑगस्ट महिन्यांत त्याने एक कार चालविण्यासाठी घेतली असून ही कार ते दोघेही ओला कंपनीसाठी वापरतात. शनिवारी सकाळी सात वाजता तो नवी मुंबईतील सी वुड्स येथून एका प्रवाशाला घेऊन सांताक्रुजच्या एअरपोर्टच्या दिशेने जात होता. ही कार पावणेआठ वाजता सांताक्रुज-चेंबूर लिंक रोड हंसभुगा जंक्शनजवळ येताच एका डंपरने त्यांच्या कारच्या शेजारी असलेल्या कारला जोरात धडक दिली. या कारची नंतर त्यांच्या कारला धडक लागून डंपरने दोन रिक्षाला धडक दिली. अपघातात दोन्ही कारसह रिक्षांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यात चारजण जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच बीकेसी पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी जखमी झालेल्या चौघांनाही पोलिसांनी तातडीने सांताक्रुज येथील व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
जखमीमध्ये अर्शद ईदअली सिद्धीकी, रिझवान रबीन खान, श्रेया राजाराम बंडगर, दुर्गेश ननंद झा यांचा समावेश होता. त्यापैकी अर्शद सिद्धीकी आणि रिझवान खान यांच्यावर तिथे उपचार सुरु आहे तर इतर दोघांनाही प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले. याप्रकरणी इम्रान खान यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी उदयनारायण चौधरी याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून दोन कारसह दोन रिक्षांना धडक देऊन चौघांना दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. डंपरवरील नियंत्रण सुटल्याने चालकाचे ताबा सुटला आणि हा अपघात झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.