कामानिमित्त बाहेरगावी जात असल्याचा फायदा घेऊन केली हातसफाई
डॉक्टर महिलेच्या घरी चोरी करणार्या मोलकरणीला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ मार्च २०२४
मुंबई, – पवईतील एका डॉक्टर महिलेच्या घरी चोरी केल्याप्रकरणी अंजू अजय भगत या २३ वर्षांच्या मोलकरणीला पवई पोलिसांनी अटक केली. कामानिमित्त कुटुंबिय बाहेरगावी जात असल्याने अंजूने तीन महिन्यांत घरात हातसफाई करताना सुमारे पावणेअकरा लाखांचा मुद्देमालाची चोरी केल्याचे उघडकीस आले असून त्यात नऊ लाखांच्या हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांसह पावणेदोन लाख रुपयांच्या कॅशचा समावेश आहे. अटकेनंतर तिला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत तिची पोलिसांकडून चौकशी सुरु असून तिच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सिमा हेमंत दांडे ही महिला तिचे पती हेमंत, मुलगा ईशान, सासू हेमलता यांच्यासोबत पवईतील हिरानंदानी गार्डन, ओडीसी दोन अपार्टमेंटच्या बाराव्या मजल्यावरील १२०१ फ्लॅटमध्ये राहते. सिमासह तिचे पती हेमंत हे दोघेही डॉक्टर असून त्यांचा हेल्थकेअर ऍडव्हरटायजिंग आणि कन्सटन्सीचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. डॉक्टर असल्याने ते दोघेही कामानिमित्त दिवसभर बाहेर राहत होते. त्यांचा मुलगा हादेखील नोकरी करत असल्याने ८४ वर्षांच्या वयोवृद्ध सासू हेमलता यांच्यासाठी त्यांनी दोन तरुणींना केअरटेकर तसेच घरातील कामासाठी ठेवले होते. त्यात अंजू भगत ही मूळची छत्तीसगढच्या लोडाम, जसपूरची रहिवाशी असून ती गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्याकडे नोकरी करते. तिचे मुंबईत कोणीही नसल्याने ती त्यांच्यासोबत राहत होती. दुसरी आरतीही दिड वर्षांपासून त्यांच्याकडे घरकामाला आहे. दिवसभर अंजू ही घरात असल्याने तिच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास ठेवून त्यांनी घरासह कपाटातील चाव्या तिच्याकडे सोपविल्या होत्या.
सासूला खरेदीसाठी बाहेर घेऊन जाणे, त्यांचा व्यवहार पाहणे, हिशोब ठेवणे तसेच इतर सर्व काम अजू करत होती. ३ नोव्हेंबरला त्यांची सासू हेमलता तिची मुलगी मृणालिनी पिंगळे हिच्याकडे एका कार्यक्रमसाठी नाशिक येथे गेल्या होत्या. याच दरम्यान ३ जानेवारी ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत सिमा ही तिच्या पती आणि मुलासोबत कामानिमित्त दिल्लीत, नंतर २४ जानेवारी ते २८ जानेवारीला दुबईत गेले होते. दुबईतून आल्यानंतर ते पुन्हा पुन्हा उदयपूर तर ईशान हा दिल्लीला निघून गेला होता. १० फेब्रुवारीला गेलेले ते तिघेही २९ फेब्रुवारीला त्यांच्या घरी परत आले होते. यावेळी घरात अंजू ही एकटीच राहत होती. घरात कोणीही नसल्याची संधी साधून तिच्या घरातून काही कॅश आणि दागिने चोरीस गेले होते.
कपाटातील दागिन्यांसह कॅशची पाहणी केल्यानंतर हा प्रकार नंतर तिच्या लक्षात आला होता. या चोरीमागे अंजूचा सहभाग असल्याचा संशय आल्यानंतर तिने तिच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. यावेळी सिमाला अंजू ही घरातील सोन्याचे दागिने चोरी करुन काही ज्वेलर्स दुकानात जाऊन नवीन दागिने बनवून घेत असल्याचे दिसून आले. तिचा मोबाईलची पाहणी केल्यानंतरत्यात काही ज्वेलर्स व्यापार्याचे मॅसेज होते. हा प्रकार उघडकीस येताच तिने कपाटातील दागिन्यांसह कॅशची पाहणी केली असता त्यात सुमारे नऊ लाख रुपयांचे विविध सोन्याचे दागिने आणि पावणेदोन लाख रुपयांची कॅश चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने अंजूवर चोरीचा संशय व्यक्त करुन पवई पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून शुक्रवारी अंजूला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिनेच या दागिन्यांसह कॅश असा पावणेअकरा लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला शनिवारी दुपारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. तिच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.