कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करुन आत्महत्येचा बनाव
आरोपी पतीसह सासरच्या इतरांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – कौटुंबिक वादातून मानसिक व शारीरिक शोषन करुन पत्नीची हत्या केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला असून मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी पतीसह त्याच्या कुटुंबियांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास करण्याची विनंती केली होती. त्यांच्या तक्रार अर्जानंतर साकिनाका पोलिसांनी पती सकाराम अचलाराम चौधरीसह इतर कुटुंबियांविरुद् हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सोमवारी १४ ऑक्टोंबरला सकारामची पत्नी नारंगी ऊर्फ गीता चौधरी हिने तिच्या साकिनाका येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गीताने आत्महत्या केली की तिची हत्या झाली हा तपासाचा भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भानाराम अचलाराम चौधरी हे मूळचे राजस्थानच्या पाली, देसुरीच्या नाडोलचे रहिवाशी आहेत. नारंगी ऊर्फ गीता ही त्यांची मुलगी असून तिचे पंधरा वर्षांपूर्वी सकाराम चौधरी याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर ती तिच्या पतीसोबत साकिनाका येथील चांदीवली, संघर्षनगरात राहत होती. त्यांना तेरा वर्षांचा महेंद्र आणि सात वर्षांची कृतिका असे दोन मुली आहेत. गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक वादातून सकाराम चौधरी हा गीता हिचा सतत मानसिक व शारीरिक शोषण करत होता. क्षुल्लक कारणावरुन तिला शिवीगाळ करुन प्रचंड मारहाण करत होता. याबाबत तिने भानाराम चौधरी यांच्याकडे अनेकदा तक्रार केली होती. सततच्या छळाला कंटाळून ती माहेरी आली होती. मात्र त्यांनी तिची समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठवून दिले होते. सकारामची समजूत काढूनही त्याच्या स्वभावात बदल झाला नव्हता. सोमवार १४ ऑक्टोंबरला गीताच्या मोबाईलवरुन त्यांचा मुलगा दिनेश चौधरी याला एक कॉल आला होता. यावेळी समोरुन बोलणार्या व्यक्तीने गीताने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले.
ही माहिती समजताच चौधरी कुटुंबिय मुंबईत आले होते. तिथे त्यांना गीताने सायंकाळी साडेचार वाजता घरात कोणीही नसताना पंख्याला गळाला फास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. तिच्या कुटुुंबियांनी तिला जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, मात्र तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. ही माहिती प्राप्त होताच साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. भानाराम चौधरी यांना त्यांची मुलगी गीता हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या करुन तिचा मृतदेह पंख्याला लटकावून नंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचा संशय आहे.
सकाराम व त्याच्या कुटुंबियांनी नियोजनबद्ध पद्धतीने हत्येचा आत्महत्या असा बनाव केला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी. तसेच गीताच्या मृतदेहाचा पुन्हा शवविच्छेन व्हावे अशी मागणी भानाराम चौधरी यांनी केली होती. या घटनेनंतर त्यांची साकिनाका पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सकाराम चौधरीसह त्याच्या कुटुंबियांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.