बाबा सिद्धीकी यांच्या हत्येतील चार आरोपींच्या कोठडीत वाढ
रेकीदरम्यान वापरलेले हेल्मेट जप्त; तपासात सहकार्य नाही
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले दोन शूटरसह चार आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने सोमवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यात गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप, प्रविण रामेश्वर लोणकर आणि हरिशकुमार बालकराम निशाद यांचा समावेश होता. यावेळी पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी आरोपी पोलीस तपासात सहकार्य करत नाही. त्यांनी रेकीदरम्यान वापरलेले हेल्मेट पोलिसांनी जप्त केले असून आणखीन पुरव्यासह आरोपींच्या चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. यावेळी कोर्टाने चारही आरोपींच्या पोलीस कोठडीत २५ ऑक्टोंबरपर्यंत वाढ केली आहे.
बिष्णोई टोळीच्या आदेशावरुन दसर्याच्या दिवशी वांद्रे येथे बाबा सिद्धीकी यांची तीन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर पळून जाणार्या तीनपैकी गुरमेल बलजीत सिंग आणि धर्मराज राधे कश्यप या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर पुण्यातून प्रविण लोणकर तर उत्तरप्रदेशातून हरिशकुमार निशाद या दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली होती. या हत्येसाठी या दोघांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर चौघांनाही किल्ला कोर्टाने सोमवार २१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना सोमवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
यावेळी पोलिसांनी हत्येसाठी रेकी करताना शूटरने एका बाईकचा वापर केला होता. या बाईकसाठी वापरण्यात आलेला हेल्मेट त्यांच्या कुर्ला येथील घरातून जप्त केल्याचे सांगितले. तसेच चारही आरोपी पोलिसांना तपासात सहकार्य करत नाही. त्यामुळे त्यांच्या चौकशीसाठी आणखीन काही दिवसांच्या पोलीस कोठडीची विनंती केली होती. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने चारही आरोपींच्या पोलीस कोठडीत २५ ऑक्टोंबरपर्यंत वाढ केली आहे. त्यानंतर या चौघांनाही पोलीस बंदोबस्तात पोलीस मुख्यालयातील खंडणीविरोधी पथकात नेण्यात आले होते. या चौघांनाही इतर आरोपींसोबत शुक्रवारी पुन्हा किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे.