इमारत बांधकामाच्या साहित्यासह भाड्याचा पेमेंटचा अपहार
४३ लाखांच्या बांधकाम कॉन्ट्रक्टरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – इमारत बांधकामाच्या साहित्यासह भाड्याचा सुमारे ४३ लाखांचा अपहार करुन एका व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बांधकाम कॉन्ट्रक्टर असलेल्या बाबूभाई कुरेशी याच्याविरुद्ध साकिनाका पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोहम्मद अजमल मोहम्मद युनूस शहा हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कुर्ला परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे स्केफ फोल्डिंगचा म्हणजे इमारत कामासाठी लागणार्या साहित्यांचा भाड्याने पुरविण्याचा व्यवसाय आहे. कुर्ल्यातील शमशुद्दीन इस्टेट परिसरात त्यांचे एक खाजगी कार्यालय आहे. सप्टेंबर २०२१ रोजी त्यांची बाबूभाई कुरेशीशी ओळख झाली होती. तो त्यांच्या कुर्ला येथील कार्यालयात आला होता. या ओळखीदरम्यान त्याने तो बांधकाम कॉन्ट्रक्टर असून त्याच्या मालकीची वांद्रे येथील कार्टर रोडवर अलबाज डेव्हल्पर्स नावाची एक कंपनी असल्याचे सांगितले. त्याच्या कंपनीला एका इमारतीच्या बांधकामाचे कॉन्ट्रक्ट मिळाले आहे. त्यासाठी त्याला विविध साईजचे पाईप भाड्याने हवे आहे असे सांगून त्याने त्यांच्याकडे संबंधित साहित्याची मागणी केली होती. त्यांच्यावर विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांना आगाऊ दिड लाखांचे पेमेंट केले होते. ठरल्याप्रमाणे सप्टेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ या कालावधीत त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला ४८ लाख रुपयांचे व्हरटीकल, लेजर, जु जँक बेस जॅक मटेरियल आणि जॉईन पिन आदी ४८ लाख १२ हजार रुपयांचे साहित्य भाड्याने पाठवून दिले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत त्याने संंबंधित साहित्याचे भाडे दिले नाही किंवा ठरलेल्या भाड्याचे पेमेंट दिले नाही. विविध कारण सांगून तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. गेल्या दोन ते अडीच वर्ष बाबूभाई कुरेशीकडून त्यांना टोलवाटोलवी केली जात होती. दिड लाख वगळता त्याने उर्वरित पैशांसह बांधकाम साहित्याचा अपहार करुन त्याने त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी साकिनाका पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा बाबूभाई कुरेशी याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून बाबूभाईची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.