म्हाडा फ्लॅटच्या बहाण्याने ६८ वर्षांच्या वयोवृद्धाची फसवणुक
तेरा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दलालाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – म्हाडा फ्लॅटच्या बहाण्याने एका ६८ वर्षांच्या वयोवृद्धाची सुमारे तेरा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार पायधुनी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनिल साहेबराव भोसले या दलालाविरुद्ध पायधुनी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अनिल हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अनिलने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसाकडून तपास सुरु आहे.
६८ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार साबेरा शब्बीर खंबाती हे पायधुनीतील मांडवी, अब्दुल रेहमान स्ट्रिटचे रहिवाशी आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यांत दलालीचे काम करणार्या अनिल भोसले याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून त्याने त्यांना म्हाडाचा स्वस्तात फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. स्वस्तात फ्लॅट मिळत असल्याने त्यांनी फ्लॅट घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यांचा विश्वास संपादन करुन त्याने त्यांच्याकडून म्हाडा फ्लॅटसाठी फेब्रुवारी २०२३ ते ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत टप्याटप्याने सतरा लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने म्हाडा फ्लॅट दिला नाही किंवा फ्लॅटचे कागदपत्रे दिली नव्हती. याबाबत विचारणा केल्यानंतर तो त्यांना सतत विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याशी म्हाडा फ्लॅटचा व्यवहार रद्द करुन त्याच्याकडून फ्लॅटसाठी दिलेल्या सतरा लाखांची मागणी केली होती. त्यामुळे त्याने त्यांना चार लाख रुपये परत केले होते. मात्र उर्वरित तेरा लाखांचा परस्पर अपहार करुन त्याने त्यांची फसवणुक केली होती.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पायधुनी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शनिवारी अनिल भोसले याच्याविरुद्ध पोलिसांनी ४०९, ४२० भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत अनिलला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. अनिल हा दलाल म्हणून काम करत असून सध्या सायनच्या प्रतिक्षानगर, सुंदर विहार हॉटेलजवळील एका निवासी अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.